महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक

277 Views

 

नवी दिल्ली , 29 : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी  27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या  एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री अनील देसाईप्रकाश जावडेकरकुमार केतकर, व्ही. मुरलीधरण, नारायण राणे आणि श्रीमती वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 02 एप्रिल 2024 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त  होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी  27 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3)  आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

  असा आहे निवडणूक कार्यक्रम           

या निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी  निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. दिनांक 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून  सायंकाळी पाच वाजता मतमोजणी  होवून निकाल जाहीर होणार आहे. 29 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.       

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत- जांभळ्या (Violet) रंगाची स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे तसेचकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबतचेही त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Related posts