गोंदिया, ता. 25 : स्वच्छता ही सेवा मोहिम अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात मंगळवारी (ता. 24) श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषद कार्यालयात कार्यरत 320 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेवून इमारत परिसरातील 21 ब्लॅकस्पॉट स्वच्छ केले.
दरम्यान जिल्हा परिषद परिसर स्वच्छ करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेत संपूर्ण स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मुरूगानंथम एम. यांनी केले आहे.
स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात दुपारी 3.00 वाजता सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. दरम्यान बैठकीला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी मार्गदर्शन करून संपूर्ण जिल्हा परिषद इमारत परिसरातील ब्लॅकस्पॉट स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार प्रत्येक विभागाला स्वच्छ करावयाच्या ठिकाणांची वाटणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. तानाजी लोखंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. श्री. जनार्दन खोटरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोंविद खामकर, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. नितीन वानखेडे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री. अतुल गजभिये यांनी स्वच्छता शपथेचे वाचन करून सर्वांना शंभर तास श्रमदान करण्याची शपथ दिली.
सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सभोवतालचा परिसर, प्रवेशद्वार ते कॅन्टीन, एनएचएम इमारतीचा परिसर तथा जिल्हा परिषदेतील अंतर्गत परिसरात सुध्दा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मोहिमेपूर्वी जिल्हा परिषदेतील 21 ब्लॅकस्पॉट शोधण्यात आले. आणि त्याठिकाणात स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.