भंडारा: उष्णतेची लाट आली सावध राहा, काळजी घ्या!

392 Views

भंडारा: उष्णतेची लाट आली

सावध राहा, काळजी घ्या!

 

प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

भंडारा, दि. 16 मे : हवामान बदलामुळे या वर्षी वातावरणीय बदलाला मोठ्या प्रमाणावर मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे. विदर्भ हा मुळी उष्ण प्रदेश आहे. हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सीअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट संबोधतात. या उष्णतेपासून बचाव कसा करावा, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी 5 ते 6 उष्णतेच्या लाटा येतात. हे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढतांना दिसत आहे. माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सूनपुर्व काळात या उष्णतेच्या लाटा येतांना दिसतात. वातावरणाचे तापमान 30 डिग्री सेल्सीअस असते तोपर्यंत मानवाला त्याचा काही त्रास होत नाही, त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उदाहरणार्थ: प्रत्यक्ष तापमान 34 डिग्री सेल्सीअस असेल , पण आर्द्रता 75 टक्के असेल तर तापमान निर्देशांक 49 डिग्री सेल्सीअस इतका असतो. म्हणजे व्यक्तीला ते तापमान 49 डिग्री सेल्सीअस इतके त्रासदायक ठरते.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्याकरिता हिट ॲक्शन प्लॅन अर्थात उष्ण प्रतिबंधक कृती योजना आखण्यात आलेली आहे. नागरिकांना संभाव्य उष्णतेच्या लाटेची आगाऊ कल्पना देण्यासाठी हवामान खात्याच्या मदतीने एक यंत्रणा निमार्ण करण्यात आली आहे, असे इशारे विविध माध्यमातुन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेसेजपासून टीव्हीपर्यंत अनेक माध्यमे कार्यरत आहे. डिजीटल युगात मोबाईलच्या क्लिकवर हवामानाचा अंदाज येतो. केंद्र शासनाने विकसीत केलेल्या दामीनी ॲपद्वारा विज पडण्याच्या घटनांची पुर्व कल्पना देण्यात येते. हवामानाविषयक ईशारे व अंदाज सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी कलर कोडींगची कल्पना वापरण्यात येते.
• पांढरा रंग- सर्वसामान्य दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान)
• पिवळा अलर्ट- उष्ण दिवस (जवळपास नेहमीच्या कमाल तापमानाएवढे तापमान)
• केशरी अलर्ट- उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सीअस जास्त तापमान)
• लाल अलर्ट- अत्यंत उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 6 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान)
उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेणेदेखील आवश्यक आहे. उष्णतेचा खालील व्यक्तिंना अधिक त्रास ठरु शकतो.
• उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक
• वृध्द लोक आणि लहान मुले
• स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक
• गरोदर महिला
• अनियंत्रित मधुमेह, हदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक
• काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक
• निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक
या अतिजोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहीजे. उष्णतेमुळे होणारा शारीरीक त्रास मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा त्रास किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो. तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश असतो. यामध्ये व्यक्तीचा मृत्यु देखील होऊ शकतो. साधारणपणे उष्णतेमुळे होणारा त्रास आणि त्याअनुषंगाने खालील प्रमाणे उपाय केले पाहिजे.
• ताप (106 डिग्री फॅ.), कातडीगरम आणि कोरडी नाडीचे ठोके वेगात आणि जोरात, घाम नाही, अर्धवट शुध्दीत
• या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. थंड जागी/एसीमध्ये न्यावे कपडे काढा. थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पॉन्जिग करा.
• उष्णतेचे विविध विकार आणि त्यावरील उपचार याबाबत डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण होणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन ते उष्माघातप्रवण भागात घेतले जाते. सर्व विभागांना एकत्रित घेऊन याअनुषंगाने खालील बाबी करणे आवश्यक आहे.
या कृती योजनेचे चार मुख्य घटक आहेत.
१. उष्णतेची लाट ही महत्वाची आपत्ती आहे, हे मान्य करणे.
२. उष्णतेच्या लाटेमुळे नुकसान होणारे समाजगट कोणते आहेत, ते ओळखणे.
३. सार्वजनिक थंडाव्याच्या जागा निर्माण करणे.
४. विविध माध्यमातुन जनतेला उष्णतेच्या लाटेबाबत सावधानतेचे ईशारे देणे.
उष्णता विकार सनबर्न- कातडी लालसर होणे, सुज येणे, वेदना, ताप आणी डोकेदुखी. साबण वापरून आंघोळ करावी, घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दुर करावा, कातडीवर फोड असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
उष्णतेमुळे स्नायुमध्ये गोळे येणे (हिट क्रॅम्प्स)
-हातापायात गोळे, पोटाच्या स्नायुत मुरडा, खुप घाम.
-रूग्णाला सावलीत आणी थंड जागी हलवा. स्नायुला हलका मसाज द्या. थोडे थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देउ नका.
उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिट एक्झॉस्टेशन)
-खुप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर, उलटी
-रूग्णाला थंड जागी श्क्यतो एसीमध्ये झोपवा. अंगावरील कपडे सैल करा, ओल्या, थंड कपडयाने अंग पूसून घ्या. थोडे थोडे पाणी पाजत रहा. उलटी होत असेल तर पाणी देउ नका. दवाखान्यात हलवा.
हे करा
• पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.
• हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलदार कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
• उन्हात जातांना टोपी/हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.
• पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड जागी ठेवा.
• ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करू नका
• शक्यतो उन्हाच्या वेळेत घरा बाहेर जाणे टाळा.
• कष्टाचे कामे उन्हात करू नका.
• पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवु नका.
• गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका.
• उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
• मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.
• खुप प्रथिनयुक्त अन्न आणि शीळ अन्न खाऊ नका.
जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा

Related posts