गोंदिया: व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृध्दी व गुणवंत खेळाडूंचा शोध

459 Views
गोंदिया दि.16 :- व्हॉलीबॉल खेळाला राज्यामध्ये एक परंपरा आहे. विविध जिल्हयांमधून खेडोपाडी हा खेळ स्पर्धात्मक व मनोरंजनाच्या माध्यमातून खेळला जातो. यातूनच राज्यातील उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, अमरावती, पुणे, सांगली, बार्शी (सोलापूर) इत्यादी जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेले आहेत.

सद्यस्थितीत राज्यामध्ये या खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनास्था, राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय मानकानुसार आवश्यक खेळाडूंची उंची, तसेच प्रशिक्षण व सरावाकडे दुर्लक्ष यामुळे या खेळाचे व खेळाडूंचे वलय कमी झालेले आहेत. याचा निश्चित तोटा खेळाडूंसोबतच राज्यालाही होत आहे.

राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची होत असलेली पिछेहाट, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये तसेच आयकर विभाग, रेल्वे, ओएनजीसी, सर्व्हिसेस इत्यादी ठिकाणी अतिशय अल्प प्रमाणात असते किंवा दिसून येत नाहीत.

व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांचा भवितव्याचा विचार करुनच खेळाडू शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलांसाठी पंधरा दिवसाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे 17 ते 30 मे 2023 या कालावधीत प्रस्तावित आहे. दिनांक 17 मे रोजी सिलेक्शन ट्रायल्सनंतर सुरु होईल. त्यामधून 24 खेळाडूंची निवड करण्यात येईल व त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरासाठी पी.सी.पांडियन, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तामिळनाडू यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार असून विविध स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध होऊन भविष्यात या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकेल

यासाठी सदर खेळाडू 1 जानेवारी 2023 रोजी 17 वर्षाखालील असावा. उंची 6 फुट 2 इंच, शाळेत शिकत असलेला किंवा नसलेला अशा खेळाडूंचा शोध आपल्या जिल्ह्यातून घेण्यात यावा.

तरी जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र खेळाडूंनी या खेळात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Related posts