गोंदिया: अंत्यविधीच्या राखेतून स्मशानात साकारणार स्मृतीवन, राखेपासून खत निर्मिती करण्याचा भजेपार ग्राम सभेचा क्रांतिकारी निर्णय..

457 Views

 

प्रतिनिधि। 27 ऑगस्ट

सालेकसा: अंत्यविधीनंतर संपूर्ण राख नदीत विसर्जित न करता त्या राखेला एका विशिष्ट टाकीत संग्रहित करून खत निर्मिती करण्याचा आणि त्याचा उपयोग वृक्षारोपणासाठी करून कालवश झालेल्या व्यक्तीच्या आठवणीत स्मृतीवन साकारण्याचा पुरोगामी आणि तेवढाच क्रांतिकारी निर्णय सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्राम सभेने पारित केला आहे. स्मशानाचं सोनं करणाऱ्या या ठरावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट रोजी ग्राम सभा पार पडली यावेळी त्यांनी माझी वसुंधरा अभियानाला बळकटी देण्यासाठी राखेपासून खत निर्मिती आणि त्यातूनच स्मृतिवन साकारण्याची संकल्पना ग्रामस्थांपुढे ठेवताच एकसुराने हा ठराव पारित करण्यात आला.

यावेळी ग्राम सेवक रितेश शहारे, ग्राम पंचायत सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा शेंडे, आत्माराम मेंढे, ममता शिवणकर, रोजगार सेवक गोपाल मेंढे, संगणक परिचालक अखिलेश बहेकार आदी सहित मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव असलेले भजेपार गाव लोक सहभागासह अनेक सेवाभावी, क्रीडा, शिक्षण आणि अध्यात्मिक उपक्रमांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असून या आगळ्या वेगळ्या निर्णयाने पुन्हा एकदा या गावाने पुरोगामित्व सिद्ध केल्याचे बोलले जात आहे. या निर्णयानंतर नदीपात्रात राख विसर्जित करण्याच्या परंपरेला तिलांजली वाहत अंत्यविधीच्या राखेतून खत निर्मिती करत याच खतापासून स्मृति वनातील वृक्षांना जैविक खतांचा पुरवठा केला जाणार आहे.

अग्निदाह नंतर जवळपास शरीराच्या वजनाची ३.५ टक्के राख उरते, जी सर्वसाधारण २.५ ते ३.० किलो भरते. ज्यामध्ये सर्वाधिक कार्बन आणि कॅल्शियम फॉस्फेट चे प्रमाण असते. यासोबतच या राखेत खनिज, पोटॅशियम क्षार, सोडियम क्षार आणि सल्फर चे प्रमाण आढळून येते. हे सर्व रासायनिक गुणधर्म वृक्षांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कार्बनमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो ज्याअर्थी जमिनीची सुपीकता वाढते.

ओबीसी जनगणनेचा ठराव पारित.

ग्राम सभेत अनेक महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले यात प्रामुख्याने शासनाने ओबीसींची जातनिहाय गणना करावी, जिल्हा परिषद शाळांमध्ये तत्काळ शिक्षक भरती करावी, भजेपार – धानोली मार्गावरील वाघ नदीवर पूल बांधण्यात यावा या मागण्यांचे ठराव पारित करून शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोबतच टॅक्स वसुलीला गती देण्यासाठी 100 टक्के कर वेळेत भरणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ राबवून प्रेरनात्मक बक्षिसे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related posts