जिल्हाधिकारी खवले यांना निवेदन देऊन सहकार्याचे आश्वासन
गोंदिया 30: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर, संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयारी करून पूर्ण क्षमतेने सेवा देण्याकरिता गोंदिया जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उत्पल शर्मा यांनी जिल्हाधिकारी राजेश खवले यांना निवेदन देऊन सहकार्य करण्यास आश्वस्त करून जिल्हाधिकारी यांच्या कामाचे अभिनंदन केले.
कोरोना विषाणूचा नवीन प्रकार डेल्टा व डेल्टा प्लसमुळे जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे नागरिकांना पूर्ण क्षमतेने सेवा देण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे, असे शर्मा यांनी भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांना औषधांचा तुटवडा, औषधांचा काळाबाजार, तसेच काही औषधांची दारापेक्षा जास्त किमतीत विक्री, यासारखे प्रकार सामोर आले असून गोंदिया जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनद्वारे अशा कोणत्याही कृत्यावर आळा घालण्यासाठी पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये नागरिकांना पूर्ण क्षमतेने सेवा देणे बाबत शर्मा यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.
दरम्यान जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी कार्य करण्याकरिता व कोणतेही गैरप्रकार किंवा औषधांचा काळाबाजार होऊ नये याकरिता दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे निर्देश दिले.