गोंदिया: जिलाधिकारी कार्यालयाच्या “मिशन रोशनी”, कोरोनामध्ये निराधार झालेल्या कावले कुटुंबाला विविध वस्तु व अर्थसहाय्य

488 Views

 

त्या अबोध बालकाच्या डोळ्यात प्रशासनाचे आपुलकीचे प्रतिबिंब….

गोंदिया दि. 29 – जिल्हा प्रशासन गोंदियाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. गरीब पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ. कधी निराधार झालेल्या कुटुंबांना अर्थसहाय तर कधी गरजू कुटुंबांना महिन्याचे रेशन इत्यादीच्या माध्यमातून कधी अधिकारी तर कधी कर्मचारी यांनी वेडो-वेडी यांच्या सामूहिक प्रयत्नाने समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासनाची मानवीयतेची वेगळी प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.

“प्रशासन हा लोकांच्या सेवेसाठी असते. अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक आहेत, अशी भावना ठेवून जिल्हा प्रशासनाकडून गरजू लोकांसाठी अनेक आगळे-वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाकडून नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीसाठी प्रशासकीय प्रक्रियेत वेळ लागतो, म्हणून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वतीने तात्काळ नुकसान भरपाईकरिता रोख स्वरूपाची मदत करण्यात येते. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना त्यांच्या तात्काळ गरजा भागविण्यास मदत होत आहे. आमगाव तालुक्यातील मोहारे कुटुंब, गोरेगाव तालुक्यातील मरस्कोल्हे कुटुंब, घारपिंडे कुटुंब, गोंदिया येथील राठोड फॅमिली, मडावी फॅमिली तसेच आता आमगाव तालुक्यातील कावले कुटुंब यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनाला एक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एवढेच नाही तर राजकीय क्षेत्रातील अनेक नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, व्यवसायिक बांधवांनी, संस्थांनी गरजू लोकांना मदत देण्याची मोहीम हातात धरली आहे.”

आमगाव तालुक्यातील कावळे कुटुंबियांना विशेष दिवाळीकरिता दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने *मिशन रोशनी* ह्या मोहिमेच्या अनुषंगाने कोरोनामध्ये निराधार झालेल्या कुटुंबांना तसेच अतिशय गरीब-गरजू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यासाठी आधार देण्याकरिता मा.जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या नेतृत्वात आमगाव तालुक्यातील योगेश्वरी अरविंद कावले ह्या निराधार झालेल्या महिलेच्या घरी प्रशासनाच्यावतीने भेट देऊन दिवाळी सण साजरा करण्यासाठी 1 महिन्याचे घरगुती सर्व प्रकारचे किराणा रेशन देण्यात आले. यामध्ये खाद्यतेल, सर्व प्रकारचे अनाज, मसाले व मुलांसाठी चॉकलेट, बिस्कीट व गोड पदार्थ इत्यादींचा समावेश होता. विशेष म्हणजे दिवाळीत उपयोगी पडणारे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी रवा, मैदा, पोहे, साखर, बेसन इत्यादी उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा समावेश होता. या सोबतच शासनाच्या विविध योजनेची माहिती सुद्धा देण्यात आली. सदर कुटुंबास पात्रतेनुसार निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. एवढेच नाही तर सह्याद्री फाऊंडेशन व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमानाने सदर कुटुंबास 30 हजार रुपयांचे अर्थसहाय नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले आहे

जिल्हा प्रशासनाचे आवाहन….
सदर मदतीच्या माध्यमातून सक्षम अधिकाऱ्यांनी, राजकीय लोकांनी, व्यवसायिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच NGO मार्फत अत्यंत गरजू लोकांना *मिशन रोशनी* अंतर्गत त्यांच्या क्षेत्रात फक्त एक-एक कुटुंबासाठी दिवाळी सणाकरिता मदत करावी जेणेकरून त्यांच्याही चेहऱ्यावर *मुस्कान* येऊ शकेल व त्यांची ही दिवाळी…… *ये दिवाली खुशीयों वाली* होईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

त्या बालकाच्या डोळ्यात………
जिल्हा प्रशासनाकडून आमगाव तालुक्यातील कावले कुटुंबियांना दिवाळी साजरा करण्यासाठी एका महिन्याचे रेशन घेऊन या कुटुंबास भेटण्याचा योग आला. कावले कुटुंब अतिशय साधारण कुटुंब आहे. या घरात विधवा झालेली महिला योगेश्वरी कावले व तिचा 5 वर्षाचा चिमुकला मुलगा आणि वयोवृद्ध असलेले सासू आणि सासरे आहेत. कोविड-19 मध्ये या कुटुंबाने अरविंद कावले म्हणजे घरचा प्रमुख कर्ता व्यक्ती गमावलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या भेटी दरम्यान जेव्हा त्यांना सांगण्यात आले की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दिवाळीसाठी रेशन पाठविण्यात आले आहे, “तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते”.

हा एक मध्यम वर्गीय कुटुंब आहे आणि अशा पद्धतीने कदाचित यापूर्वी त्यांनी कधीही मदत घेतली नसेल. रेशन पॅकेट उघडून दाखवत असताना घराच्या आतून एक चिमुकला बाळ निघाला आणि रेशनच्या पॅकेटमध्ये आपल्यासाठी कामाचा काय आहे? हे आतुरतेने पाहू लागला. एवढ्यातच उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्याला एक बिस्कीटचा पॅकेट दिला. तो खुश झाला आणि तात्काळ बिस्कीटचा पॅकेट फोडून बिस्किटाचा आनंद घेऊ लागला लागला. “त्याला माहित नाही त्याच्या सोबत काय घडले आहे ? कोणती घटना झाली आहे त्याचे बाबा आता नाहीत”. यानंतर याबाळाने एका खड्ड्याच्या पॅकेटमध्ये हात टाकून गोड पदार्थाचा एक डबा काढला आणि आत मध्ये जाऊन एक चमचा आणून डबा उघडू लागला. त्याच्या डोळ्यात आनंद, होता….उत्साह होता. सोबतच जिल्हा प्रशासनाचे आपुलकीचे प्रतिबिंब त्या बालकाच्या डोळ्यात दिसू लागले होते. प्रशासनाच्या वतीने या कुटुंबाची भेट घेण्याचा योग मिळाला हेच कर्मचाऱ्यांसाठी समाधान आणि आनंदाची बाब.

Related posts