गोंदिया: अर्जुनी मोरगावात आढळला राज्य “फुलपाखरू”, फुलपाखराची राज्य फुलपाखरू म्हणून निवड करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे

467 Views

 

जगभरात 17820, भारतात 1510 तर महाराष्ट्रात 240 ते 250 फुलपाखरांची प्रजाति..

प्रतिनिधि।

गोंदिया। फुलपाखरांच्या विविध प्रकारच्या प्रजाती असतात.राज्य फुलपाखरू असतो याची माहिती अनेकांना नसते.मात्र निलवंत (ब्ल्यू मॉर्मोन) हा आपला राज्य फुलपाखरू आहे.विदर्भात अत्यंत कमी दिसणारा हा राज्य फुलपाखरू अर्जुनी मोरगाव येथे दिसून येत आहे.येथे हा आकर्षक फुलपाखरू दिसून येत असल्याने निसर्गप्रेमींमध्ये कुतूहल व्यक्त केले जात आहे.


फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्वपूर्ण घटक व वनस्पतींसह परस्परसंबंध असलेला कीटक आहे.निलवंत नावाच्या फुलपाखराला जून २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाने “राज्य फुलपाखरू” म्हणून घोषित केले.अशी फुलपाखराची राज्य फुलपाखरू म्हणून निवड करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.
जगभरात १७८२०,भारतात १५१० तर महाराष्ट्रात सुमारे २४० ते २५० फुलपाखरांच्या प्रजाती आहेत.देशातील १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. निसर्गात फुलपाखरांची भूमिका महत्त्वाची असते.निलवंत हे फुलपाखरू श्रीलंका तसेच भारतातील महाराष्ट्र, दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळतो.उत्तरेला गुजरात पर्यंत सापडल्याच्या नोंदी आहेत.बऱ्याचदा बागांमध्ये किंवा मुंबई, पुणे,बंगलोर या शहरातील वाहतुकीच्या गर्दीत आढळतो. ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतरचे हे दुसरे सर्वात मोठे फुलपाखरू आहे.विदर्भात तुरळक प्रमाणात या फुलपाखरांचे अस्तित्व असले तरी विशेषतः सह्यांद्री पर्वतरांगा गडचिरोली, चिखलदरा सारख्या सदाहरित जंगलपट्टयात दिसून येतात. मात्र अर्जुनी मोरगाव येथील हौशी निसर्गप्रेमी प्रा. अजय राऊत व डॉ. शरद मेश्राम यांनी हा फुलपाखरू स्थानिक सिव्हिल लाईन व एस एस जे महाविद्यालय परिसरात बघितला आहे.

ओळख फुलपाखराची…
निलवंत फुलपाखरू क्वचितच आढळतो. रंग मखमली काळा,पंखाच्या वरच्या भागाला निळसर पट्टे,खालच्या भागाला निळ्या रंगाच्या ठिपक्यांची गर्दी असते.मादीच्या पंखांच्या खालच्या भागाला गर्द लाल रंगाचे पाच ते सात ठिपके,पंखांची खालची बाजू काळ्या रंगाची असते.आपल्या आकर्षक रंगांनी लक्ष वेधून घेणारा हा फुलपाखरू आहे.फुलांच्या मकरंदातून न मिळणारी आवश्यक पोषकद्रव्ये मिळवण्यासाठी ही फुलपाखरे चिखल,कुजलेले पदार्थ यावर बसलेली दिसतात. लिंबूवर्गीय वनस्पती हे त्यांचे आवडते वस्तीस्थान आहे.जंगलातील वाटा व झरे यावरही आढळतात. याच्या नराला सूर्यप्रकाश आवडतो.तो सावली टाळतो.अशोक, मोगरा कुलातील फुले,झिनिया या फुलांना हे फुलपाखरू सतत भेटी देतात.
प्रा अजय राऊत
प्रा डॉ शरद मेश्राम

Related posts