गोंदिया: पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, जिलाधिकाऱ्यानी केली शोध व बचाव साहित्यांची पाहणी

205 Views

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची क्षमता बांधणी महत्त्वाची- जिल्हाधिकारी नयना गुंडे

प्रतिनिधी।
गोंदिया, दि.27: सद्यस्थितीत राज्यात पुराचा तडाखा सुरू असून राज्यातील अनेक जिल्हे पूर प्रभावित आहेत. जिल्ह्यात मान्सून कालावधीत पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन ताकदीने सज्ज आहे, असे वक्तव्य जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज दि.27 जुलै रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची पाहणी दरम्यान केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णी व पथकातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाली असून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची क्षमता बांधणी पाहण्यासाठी जिल्हाधिकारी गुंडे यांनी पूरपरिस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी रबर/फायबर बोटी, लाइफ जॉकेट, लाइफ बॉय, इमरजेंसी लाईट, OBM मशीन, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस, सर्चलाईट इत्यादी सर्व साहित्यांचे निरीक्षण करून कार्यरत असल्याची खात्री केली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाय योजना, जिल्हा नियंत्रण कक्षाचे संचालन, मानक कार्यपद्धती (SOP) व पूर दरम्यान संबंधित सर्व विभागांचे समन्वय इत्यादी बाबत जिल्हाधिकारी यांनी यावेळेस संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.
         जिल्ह्यात मागीलवर्षी 2020 मध्ये ऑगष्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पूरपरिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानी तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचे, घर, गोठे व जनावरे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व त्यातील खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान तसेच वेळेवर शासनाकडून तात्काळ मदत देण्याकरीता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. या यावर्षी सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी गुंडे यांनी पूरग्रस्त गावांची माहिती व पूर येण्याची कारणे तसेच शोध व बचाव करण्याकरीता प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती जिल्हाधिकारी गोंदिया यांनी यावेळी घेतली.

पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आंतरराज्य पूर नियंत्रण समितीची सभा

राज्यात उद्भवलेले पूर परिस्थिती लक्षातघेता विभागीय आयुक्त नागपूर व जबल्पुर यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेश राज्यातील जिला शिवनी, छिंदवाडा, बालाघाट तसेच महाराष्ट्र राज्यातील गोंदिया भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांची सभा आज दि.  27 जुलै रोजी घेण्यात आली. सदर सभेत मध्यप्रदेश येथील संजय सरोवर येथून वैनगंगा नदीच्या मार्फत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाच्या परिचालन करण्यासंबंधी तसेच धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी पूर्व सूचना व सर्व संबंधित जिल्ह्यांचे एकमेकांशी समन्वय साधण्याकरिता महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या दरम्यान मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील धरण व नद्यांची सद्यस्थिती व पूर परिस्थिती दरम्यान संबंधित यंत्रणेला सुसज्ज ठेवणे संबंधी माहिती दिली.

आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवावे- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सज्ज आहे. प्रशासन व नागरिक हे समाजातील घटकाचे दोन बाजू आहेत, अश्या परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी नागरिकांना केले आहे.

Related posts