गोंदिया मेडिकलच्या इमारतीचा मार्ग सुकर…६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर : सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी, प्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द

713 Views

 

प्रतिनिधि। 15 जुलै

गोंदिया : येथील मेडिकल कॉलेजच्या बांधकामाला निधी अभावी सुरुवात झाली नव्हती. बांधकामाला चार ते पाच वर्ष विलंब झाल्याने बांधकामाच्या खर्चात वाढ झाली होती. त्यामुळे इमारत बांधकामात निधीचा अडसर निर्माण झाला होता. खा. प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. गुरुवारी (दि.१५) वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकलच्या इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाज पत्रकाला प्रशासकीय मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारतीचा मार्ग सुकर झाला आहे.

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला. पण मेडिकलच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. परिणामी मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकल कॉलेजचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांना सुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नव्हता. मेडिकलच्या डॉक्टर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी प्रशस्त जागा मंजूर करण्यात आली आहे. पण काही अडचणींमुळे हे बांधकाम रखडले होते.

खा. प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यासह, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीसुद्धा गोंदिया येथे भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यानंतर गुरुवारी (दि.१५) राज्य शासनाने गोंदिया मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.

यासाठी ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी निधी देखील उपलब्ध करुन दिल्याने मेडिकलच्या इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Related posts