गोंदिया: जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन अनाथ मुलींना मदतीचा हाथ, 20 प्रशासकीय अधिकारी झाले अनाथ मुलींचे पालक

390 Views

 दरमहा दहा हजाराचा मदतीचा संकल्प

प्रतिनिधि।
गोंदिया,दि.24 : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील खाडीपार या गावी आज 24 जून रोजी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आई-वडील मृत्यू पावल्यामुळे अनाथ झालेल्या वैष्णवी व आरती या दोन मुलींच्या कुटूंबाला भेट देऊन चिमुकल्यांच्या आजीजवळ दहा हजार रुपये रोख मदत देवून मरस्कोल्हे कुटूंबाची सांत्वना दिली व त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा बळ दिला.

अनाथ असलेल्या मुलीचे नाव वैष्णवी सुरजलाल मरस्कोल्हे वय 4 वर्ष व आरती सुरजलाल मरस्कोल्हे वय 2 वर्ष या दोन मुलींचा सांभाळ करण्याची पूर्ण जबाबदारी ही त्यांची आजी सागनबाई शिवराम मरस्कोल्हे यांच्यावर आली. आजीची वय 80 वर्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये या कुटूंबाने जगावे कसे तसेच दोन लहान बालिकांचा सांभाळ कसा करावा अशी चिंता त्या आजीला सतावत होती. गोंदिया जिल्हाधिकारी यांनी ही बाब हेरली आणि विविध अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर या कुटूंबाला मदत करण्याचे आवाहन केले आणि तातडीने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी या कार्याला उत्स्फुर्त प्रतिसाद देवून 20 अधिकारी यांनी दरमहा 500 रुपये योगदान देऊन दहा हजार रुपयांची मदत देण्याकरीता इच्छुक झाले त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

गोंदिया जिल्हाधिकारी राजेश खवले, उपवनसंरक्षक कुलराजसिंग, अप्पर जिल्हाधिकारी अशोक पाटील, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती नंदिनी आवळे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल कचवे, जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे, तहसिलदार श्रीमती उषा चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उदय खर्डेनवीस, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रविण तांबे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढीवे, IB गोंदियाचे राहुल तिवारी, GM Land MNRCL मुंबईच्या श्रीमती माधवी सरदेशमुख अशी मदत देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहे.

जिल्हाधिकारी राजेश खवले यावेळी म्हणाले, ही मदत केवळ एक महिन्यापूरती किंवा एकाच वेळेपुरती मर्यादित नसून जोपर्यंत हे कुटूंब स्थिर होत नाही तोपर्यंत त्या कुटूंबाला मदत केली जाणार आहे. दोन अनाथ मुलींना सांभाळणाऱ्या आजीचे वय 80 वर्ष आहे हे विचारात घेऊन मुलींच्या भविष्कालीन व्यवस्थेचे देखील नियोजन या 20 अधिकाऱ्यांनी केलेले आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेमार्फत सदरहू कुटूंबाला बालकांचे संगोपनाकरीताचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. तसेच तहसिलदार यांनी सदरहू कुटूंबाला स्वस्त धान्य आणि सामाजिक सहायता योजनेचा लाभ देखील मिळूवन देण्याची कार्यवाही सुरु केलेली आहे. चांगल्या कामासाठी माणूस धनातून श्रीमंत असणे आवश्यक नाही, तर मनातून श्रीमंत असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कुटूंबाला अधिकाधिक लोकांनी मदत करावी व त्यांचे दु:ख नाहीसे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.

वर्षभरापूर्वी सुरज मरस्कोल्हे यांचा किरकोळ आजाराने मृत्यू झाला. तर मे 2021 या महिन्यात त्या चिमुकल्यांच्या आईने देखील जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अगदी निरागस आणि समज नसलेल्या या दोन्ही चिमुकल्या अनाथ झाल्या अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

यावेळी तिरोडा उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, प्रभारी तहसिलदार नरेश वेदी, नायब तहसिलदार राजेंद्र वाकचौरे, नायब तहसिलदार प्रविण जमदाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचे प्रतिनिधी शैलेश नंदेश्वर, आशा सेविका वर्षा बालदे, तलाठी शंकर चुटे, मंडळ अधिकारी बी.एन.वरखडे, सरपंच दिनेश टेकाम, पोलीस पाटील देवानंद कोटांगले उपस्थित होते.

Related posts