गोंदिया: अटी व शर्तींच्या अधीन राहून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार

224 Views

प्रतिनिधि।

गोंदिया। कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता 30 जून 2020 पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात आले होते. तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनायोग्य रस्ते विचारात घेता पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून 1 नोव्हेंबर 2020 पासून पर्यटन सुरु करण्यात येत आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या 50 टक्के एवढ्याच पर्यटकांना वाहनात प्रवेश दिला जाईल. पुढील आदेशापर्यंत 10 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पर्यटनाकरीता प्रवेश देण्यात येणार नाही. सर्व पर्यटक, गाईड, वाहन चालक यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. मास्कशिवाय प्रवेशद्वारावरुन प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पर्यटक वाहनात बसण्यापुर्वी सर्वांनी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत वापरलेले मास्क, हातमोजे, पाण्याच्या बाटल्या इत्यादी साहित्य वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवेशद्वाराजवळ सोशल डिसटन्सींग पाळणे आवश्यक राहील. पर्यटनाकरीता पुढील आदेशापर्यंत खाजगी वाहनांचा वापर करता येणार नाही. व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी या व्याघ्र प्रकल्पाचे/राज्य शासन/केंद्र शासन/स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
वरीलप्रमाणे सुरु करण्यात येणारे पर्यटन हे केवळ स्थानिक परिस्थिती योग्य असेल तेव्हाच चालू राहील. अति पाऊस वा व्यवस्थापन विषयक इतर कामांसाठी हे मार्ग बंद करण्याचे तसेच कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्तरावर काही गंभीर परिस्थिती उदभवल्यास प्रवेश बंद ठेवण्याचे अधिकार वन्यजीव विभागाकडे राखून ठेवले आहे. ऑनलाईन बुकींगनंतर पर्यटन प्रवेशद्वारावर उपलब्धतेनुसार पर्यटकांना ऑफलाईन प्रवेश देण्यात येईल.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे ऑनलाईन सफारी आरक्षण व निवास व्यवस्था www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावरुन 1 ऑक्टोबर 2020 पासून उपलब्ध होईल. अशी माहिती नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम यांनी दिली आहे.

Related posts