186 Views
डॉ. फुके यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात विशेष कार्यशाळा 24 एप्रिल ला…
प्रतिनिधि।
गोंदिया। पूर्व विदर्भात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे.
या कार्यशाळेत तालुकास्तरावरील सर्व संबंधित गावांचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी होणार असून, आपल्या गावातील तलावांची सविस्तर माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. फुके यांनी केले आहे.
पूर्व विदर्भातील कोरडवाहू भाग जलसमृद्ध करण्यासाठी डॉ. फुके यांनी जलसंधारणाच्या विविध योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानाला गती मिळाली असून, तलावांचे खोलीकरण व पुनरुज्जीवनाचे काम आता अधिक नियोजनबद्ध रितीने होणार आहे.
सध्या गोंड राजांच्या काळात बांधले गेलेले ६,७०० हून अधिक माजी मालगुजारी तलाव गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे सिंचन क्षमता कमी झाली असून भूजल पातळीही घटली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत तलाव खोलीकरणाच्या कामातून बाहेर काढण्यात येणाऱ्या गाळावर कोणतेही स्वामित्वधन (रॉयल्टी) आकारले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
या उपक्रमाला टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभले आहे. तलावातील गाळाचा वापर शेती सुधारणा, सार्वजनिक जागांचे समतलीकरण, शाळा व अंगणवाड्यांच्या परिसरात माती भराव यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही या उपक्रमाचा थेट फायदा होणार आहे.
तलाव पुनरुज्जीवनामुळे पाणीसाठवण क्षमता वाढेल, भूजल स्तर सुधारेल, विहिरी व नळपाणी योजना कार्यक्षम होतील, शेतकऱ्यांना सिंचनासाठी भरपूर पाणी मिळेल, मासेमारी व्यवसायास चालना मिळेल आणि संभाव्य पूरस्थितीवरही नियंत्रण ठेवता येईल.
माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारामुळे पूर्व विदर्भातील जलसंपत्ती संवर्धनाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे – असा अध्याय जो पाणीटंचाई दूर करत निसर्ग, शेती आणि संपूर्ण ग्रामीण जीवनशैलीला नवसंजीवनी देणार आहे.