गोंदिया/भंडारा।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 0.3 केंद्र सरकारने संसदेत मांडलेल्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेला केंद्रीय अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करणारा, बळ देणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्पवर महिला, युवक, शेतकरी व गरीब या घटकांच्या उत्थानाला प्रामुख्याने मध्यवर्ती ठेवून आज देशाच्या अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामनजी यांनी लोककल्याणकारी व धोरणात्मक अर्थसंकल्प सादर केला आहे.
विशेषतः देशातील युवकांसाठी आजचा अर्थसंकल्प पर्वणी आहे. यात शैक्षणिक मदतीपासून ते रोजगार निर्मितीपर्यंत अनेक योजनांची घोषणा केली आहे. मुद्रा कर्जाची मर्यादा दहा लाखावरून वीस लाख करण्यात आली आहे; तसेच एम. एस. एम. ई. योजनेअंतर्गत १०० कोटी रुपयांपर्यंतची कर्जे आता उपलब्ध होणार आहेत. यामुळे युवा उद्योजकांसाठीदेखील अत्यंत पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सरकारद्वारे करण्यात आला आहे.
महिलांच्या विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या भरघोस निधीमुळे देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. तसेच शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणात निधी सरकारने मंजूर केला आहे. सध्याच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या विस्तारीकरणसह नवीन काही योजना सरकारने आणल्या आहेत.
यासह पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, पर्यटन, ऊर्जा, ग्रामविकास या सर्व क्षेत्रावर देखील या अर्थसंकल्पात भर दिला आहे. महाराष्ट्राच्या शहर व ग्रामीण विकासाचा समतोल साधत केंद्राने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.
एकंदर अत्यंत उत्तम व विकसित भारताच्या संकल्पनेला साजेसा असा हा लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे. मी यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी व देशाच्या अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामजी यांचे मनःपूर्वक आभार मानतो व अभिनंदन करतो.