इंजिनियर, डॉक्टरसह पहिल्यांदाच विद्यार्थी झाले JEE ऍडव्हान्स साठी पात्र, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पुन्हा मोठे यश

1,071 Views

          गोंदिया, दि.16 :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी ‘मिशन शिखर’ हा उपक्रम प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सुरू केलेला आहे. मागील दोन वर्षात मिशन शिखर उपक्रमाला मोठे यश प्राप्त झाले, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा असेच मोठे यश मिळालेले आहे. मागील दोन वर्षात एकलव्य स्कुलचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इंजिनियर, डॉक्टर झाले.  अभिमानाची गोष्ट अशी की पहिल्यांदाच यावर्षी शासकीय आश्रम शाळेतील  विद्यार्थी JEE ऍडव्हान्स साठी पात्र झालेले आहेत.

या संपूर्ण यशाचे श्रेय प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना जाते. श्री. राचेलवार यांच्या मार्गदर्शनात संजय बोंतावार, प्राचार्य एकलव्य स्कुल बोरगाव यांनी या उपक्रमाचे यशस्वी नेतृत्व केले. या कार्यालयाच्या स्तरावरून  शासकीय, एकलव्य,अनुदानित, नामांकित आश्रम शाळेतून व शासकीय वसतिगृहातून विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेद्वारे निवड केली. तद्वतच  संपूर्ण 4 महिन्याच्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना विषय निहाय मार्गदर्शन केले. आठवड्यातून एकदा सराव परीक्षा आयोजित केली. परीक्षेच्या एक महिना अगोदर पासून दररोज सराव पेपर सोडवून घेतल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला आत्मविश्वासाने समोर गेले. यामध्ये शासकीय आश्रम शाळेचे 6 विद्यार्थी, अनुदानित आश्रम शाळेचे 5 विद्यार्थी, एकलव्य स्कुल मधील 3 विद्यार्थी, नामांकित आश्रम शाळेचे 4 विद्यार्थी असे एकूण 18 विद्यार्थी JEE ऍडव्हान्स साठी पात्र झालेले असून शासकीय आश्रम शाळा मजितपुर येथील चैतन्य पुरुषोत्तम मसराम या विद्यार्थ्याने 75.86 टक्के गुण मिळविले आहे.

जे विद्यार्थी JEE ऍडव्हान्स परिक्षेकरीता पात्र होऊ शकले नाही ते सर्व विद्यार्थी एप्रिल मध्ये होणाऱ्या परीक्षेची तयारी करणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. बारावीची परीक्षा आटोपल्यानंतर पुन्हा एका महिन्याचे मिशन शिखरच सत्र घेण्यात येणार आहे. तसेच जे विद्यार्थी JEE ऍडव्हान्स करिता पात्र झालेले आहेत त्यांची सुद्धा तयारी करून घेण्यात येणार असल्याची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी शिरीष सोनेवाने यांनी दिली.

Related posts