राज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई

1,543 Views

 

माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा..

भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी
गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती.

या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचीही उपस्थिती होती.

माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना अवकाळी पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांत भातपिकाचे मोठे नुकसान व कापणी झालेल्या धानाच्या ढिगाऱ्यांची माहिती दिली होती. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान व किडीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांची माहिती देण्यात आली. फुके यांनी शासनाकडे हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदतीची मागणी केली होती.

आर्थिक संकटाची गांभीर्याने दखल घेऊन आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने अधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आज दोन्ही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देऊन सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले असून हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत दिली आहे. जी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

फुके म्हणाले, राज्य शासन प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे.राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत आणि यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्धाराने काम करत आहे. फुके यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्याबद्दल राज्यातील यशस्वी सरकारचे आभार व्यक्त केले.

Related posts