गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या इमारतील बरेच वर्ष झाले असून या इमारतीचे बांधकाम योग्यप्रकारे करण्यात आले नसल्याने प्रशासकीय कामे करताना विविध अडचणी होतात. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर नगर विकास मंत्रालयाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचाच पहिल्या टप्प्यातील दोन कोटी रुपयांचा निधी नगर विकास सोमवारी (दि.४) मंजूर केला आहे.
गोंदिया नगर परिषदेच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाली आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी नगर परिषदेची इमारत असून जागासुध्दा भरपूर आहे. पण या इमारतीचे योग्य बांधकाम करण्यात आले नाही. तर ही इमारत काहीशी जीर्ण झाली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नगर परिषदेची अत्याधुनिक स्वरूपाची इमारत तयार करण्यात यावी. यामुळे नगर परिषदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यास मदत होईल. शिवाय शहराच्या विकासातसुध्दा भर पडेल.
यासाठी खा. प्रफुल्ल पटेल अलीकडेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर नगर विकास मंत्रालयाने नगर परिषदेच्या अत्याधुनिक इमारत बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाला सुरुवात करण्यासाठी सोमवारी २ कोटी रुपयांचा निधी प्रारंभिक कार्य साठी दिले आहे. तर उर्वरित रुपयांचा निधी लवकरच बजेटमध्ये मंजुर केला जाणार आहे. त्यामुळे गोंदिया नगर परिषदेच्या नवीन इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे इमारतीचा लुकसुध्दा बदलणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.
शहराच्या विकासात भर पडणार…
गोंदिया नगर परिषदेला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली आहे. शहराच्या मुख्य ठिकाणी इमारत आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नगर परिषदेची नवीन इमारत तयार झाल्यास शहराच्या विकासातसुध्दा भर पडणार आहे. ही अनेक वर्षांपासून समस्यासुध्दा आता खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारामुळे मार्गी लागणार आहे.