दुचाकी चालवितांना हेल्मेट अवश्य वापरा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

425 Views

          गोंदिया, दि.१२ :- रस्ते अपघाताच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक अपघात हे दुचाकीचे आहेत असे आपल्या लक्षात येईल. हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाणही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी हेल्मेटचा अवश्य वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे हेल्मेट जनजागृती सुरू असून या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे. कार चालवितांनासुद्धा सीट बेल्टचा वापर करण्यास विसरू नका असेही त्यांनी सांगितले.

       दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरासंबंधी गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या काळात वाहन घसरून अपघात होण्याचे प्रमाण अधिक असते. पावसाच्या पाण्याने माती वाहून रस्त्यावर आल्यामुळे गाडी घसरूनही अपघात होतात. अशावेळी डोक्यावर हेल्मेट असल्यास प्राण वाचू शकतात. या सर्व बाबींचा विचार करता हेल्मेट वापरणे आपल्या हिताचेच आहे.

          दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा असे गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने याबाबत वारंवार आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे व दुचाकी चालवितांना हेल्मेटचा अवश्य वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

Related posts