गोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

172 Views

 

          गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

          राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणुन परदेशातील विद्यापिठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाकरिता खर्च भागविण्यासाठी अनुदान म्हणुन शिष्यवृत्ती देण्याची तरतुद सदर शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे.

          या योजने अंतर्गत 16 मार्च 2016 चे शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु.6.00 लाख पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना परदेशात एम.बी.ए. पदव्युत्तर, वैद्यकिय अभ्यासक्रम पदवी/पदव्युत्तर, बी.टेक. इंजिनिअरींग, विज्ञान व कृषी पदव्युत्तर आणि इतर विषयाचे अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रामुख्याने शिष्यवृत्ती देण्याची शासनाची तरतुद आहे.

         अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, गोंदिया या कार्यालयातुन विहीत नमुन्यात शिष्यवृत्तीसाठी नमुना विनामूल्य अर्ज प्राप्त करुन परिपुर्ण माहीती भरुन व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांचे कार्यालयामार्फत अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नागपुर यांचेकडे 9 जून 2023 पर्यंत सादर करावयाचे आहेत. सदर योजनेचा अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांनी केले आहे. सदर योजनेबाबत अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 07199-225144 यावर संपर्क साधावा.

Related posts