सोने नव्या उच्चांकावर; चांदीचे भावही वधारले! काय म्हणाले भंडाऱ्यातील व्यापारी… 

139 Views

 

तुषार कमल पशिने

भंडारा: लग्नसराई आटोपण्याच्या स्थितीत असताना सोने व चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. ५ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२ हजार ४१२ रुपये प्रतितोळावर (१० ग्रॅम) पोहचला. तर चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली. जागतिक मंदीचे पडसाद, बँकिग संकट व शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे साेने व चांदीची भाववाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

फार पूर्वीपासून मानवाला सोने व चांदी धातूचे आकर्षण राहिले आहे. त्यातच सोने, चांदी धातूचे दागिने मिरवण्याची मोठी क्रेझ आजही महिलांमध्ये कायम आहे. लग्नसराईमध्ये सोने खरेदीला उधाण आलेले असते. वर-वधूंसाठी सोने-चांदीचे दागिने व वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे साहजिकच सोने व चांदीची मागणी वाढत असल्याने भावही वाढलेले दिसून येतात.

लग्नसराईनंतर सोन्याच्या भावात उतरण सुरू होते. परंतु यंदा मात्र परिस्थिती वेगळीच आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम आटोपण्याच्या स्थितीत असताना सोन्याचे भाव दोन हजाराने वाढले आहेत. सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२,४१२ रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) झाला आहे. २२ कॅरेट शुद्ध सोने ५८ हजार १२७ रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) झाले आहे. चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. ५ मे रोजी चांदीचा भाव ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचले होते.

पहिल्यांदाच सोने व चांदीच्या भावात ऐतिहासिक वाढ नोंदविण्यात आली आहे. एकीकडे लग्नसराईचा हंगाम आटोपता असताना व खरेदी कमी झालेली असताना भाववाढ होत आहे. यामुळे निश्चितच सराफा व्यावसायिकांत चिंतेचे सावट आहे.

विजय हाडगे, सराफा व्यावसायिक.

Related posts