गोसेखुर्द प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य या दुहेरी कोंडीत अडकलेल्या तीन गावांचा योग्य मोबदला आणि पुनर्वसन करण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ. फुके

254 Views

 

प्रतिनिधी.
भंडारा. जिल्ह्यातील पवनी तालुका अंतर्गत उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याला लागूनच मौजा पाहुणगाव, कवडशी, गायडोंगरी ही गावे असून, या गावांतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गावाच्या एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला मारू नदीमुळे हे गाव जलमय झाले आहे. नदीच्या धरणाच्या पाण्यामुळे येथील ७० टक्के जमीन ओली राहते. एवढेच नाही तर एका बाजूला गोसे खुर्द प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र आणि दुसरीकडे वन्यजीव अभयारण्य यामुळे हे गाव दुहेरी कोंडीत सापडले असून, दुर्दशेचे अश्रू ढाळत आहेत.

याप्रकरणी ग्रामस्थांनी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची भेट घेऊन पाहुणगाव, कवडशी, गायडोंगरी या गावांचा वन्यजीव अभयारण्यात समावेश करून योग्य मोबदला व गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती.

ही बाब गांभीर्याने घेत जिल्ह्याचे माजी वन राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील या गावांच्या दुर्दशेविषयी व झालेल्या अन्याया विषयी च्या स्थितीची माहिती दिली व या गावांचा समावेश वन्यजीव अभयारण्यातील गावात करुन त्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली.

हे गाव एकीकडे वन्यजीव अभयारण्य आणि दुसरीकडे गोसेखुर्द प्रकल्प अशा दुहेरी कोंडीत सापडले आहे. ७० टक्के जमीन ओली असताना गाव पाण्याखाली आहे. या गावाच्या अवतीभवती असलेले गाव गोसेखुर्द प्रकल्पामध्ये पुनर्वसनात सामील आहे तर केवळ या गावांना यापासून दूर ठेवण्यात आले आहे. गायडोंगरी गावात घरांची संख्या ८०/८५ असून लोकसंख्या ४०० इतकी आहे. तसेच कवडशीमध्ये घरांची संख्या ३० असून लोकसंख्या १६० आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या या तीन गावांच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक पाऊल उचलुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य मोबदला व पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार हे जनहितासाठी काम करणारे सरकार आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी शासन प्रत्येक स्तरावर तत्पर आहे. श्री.फुके यांनी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले.

Related posts