गोंदिया: राज्य राखीव पोलीस बलाचे कार्य कौतुकास्पद – SP निखिल पिंगळे

445 Views


७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

          गोंदिया, दि.8 :  राज्य राखीव पोलीस बल अनन्यसाधारण महत्व असलेले बल असून बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण प्राप्त बल आहे. महाराष्ट्र पोलीस बलाचा कणा म्हणून या बलाची ओळख आहे. अनेक मोहिमा यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या राज्य राखीव पोलीस बलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले. राज्य राखीव पोलीस दलाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात बिरसी कॅम्प गोंदिया येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

          दरवर्षी ६ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन बटालियन मार्फत करण्यात येते. ज्यामध्ये प्रामुख्याने ग्राम स्वच्छता अभियान, रस्ते सुरक्षा व अपघात मुक्त भारत अभियान, शालेय मुलांकरिता शस्त्र प्रदर्शनी अशा विविध उपक्रमांचा यात समावेश असतो. वर्धापन दिनाच्या निमित्ताने बटालियनमध्ये हर्ष फायर कवायतीचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. सदर कवायतीचे संचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक  के.बी. सिंग यांनी केले. कवायतीमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे निशाण म्हणून प्राप्त अलंकारण ध्वज परेडच्या मध्यभागी स्थापित होता, याचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक राकेश शंभरकर तसेच पोलीस उपनिरीक्षक जगधने यांनी केले.

          रेसिंग डे परेड मध्ये पोलीस उपनिरीक्षक लोथे, नितीन इंगळे, प्रशांत नारखेडे तथा संपूर्ण जवानांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन गटाचे समादेशक अमोल गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक समादेशक संजय साळुंखे, कैलास पुसाम तसेच मंगेश शेलोटकर यांनी अतिशय उत्तम प्रकारे तयार करून घेतले. परेड व्यतिरिक्त विशेष आकर्षण म्हणून के.के. इंग्लिश स्कूलद्वारा सादर करण्यात आलेले देशभक्तीपर नृत्य तसेच आदिवासी नृत्य सादरीकरण झाले. याप्रसंगी बटालियनच्या विशेष प्राविण्य प्राप्त पोलीस अधिकारी व अमलदार यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

         विशेष अतिथी म्हणून आमंत्रित सहयोग हॉस्पिटल गोंदियाचे सीईओ अजित कुमार, सेंटर हेड डॉक्टर सौरभ वर्धनी, सायकलिंग संडे ग्रुप गोंदिया, इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या श्रीमती रीना भुते, लायन्स क्लब गोंदिया सिबिलचे मुरलीधर माहुरेश हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचा प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्धापन दिन परेड करिता ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी तथा ग्रामपंचायतीचे सदस्य व पोलीस अधिकारी, अमलदार यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक सहायक संजय साळुंखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक समादेशक मंगेश शेलोटकर यांनी मानले. कार्यक्रमाची आखणी समन्वय तथा सूत्रसंचालन पोलीस कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांनी पार पाडले. सदरचा वर्धापन दिन यशस्वी होण्याकरिता बटालियनच्या संपूर्ण पोलीस अधिकारी व अमलदार यांनी परिश्रम घेतले.

Related posts