गोंदिया: पुढील दोन-तीन महिने उष्णतेचे, उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी

647 Views

 

गोंदिया: पुढील दोन-तीन महिने उष्णतेचे,उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी

         गोंदिया, दि.8 : वातावरणीय बदल व तापमानात अचानक झालेली वाढ लक्षात घेता पुढील दोन ते तीन महिने उष्णतेची राहणार असा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघातबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

         सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व डॉ. निरंजन अग्रवाल यावेळी उपस्थित होते. वातावरणीय बदल व उष्माघातामुळे होणाऱ्या आपत्तीबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व  उप केंद्र या ठिकाणी शीतगृह निर्माण करण्यात आली आहेत. उष्माघात झालेल्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली.

         सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना उष्णतेचा तडाखा बसण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे लहान मूल, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व आजार असणाऱ्यांनी या काळात अधिक खबरदारी घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याच काळात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात. उन्हाची तीव्रता लक्षात घेता रोहयोच्या कामाच्या वेळा थोडया अलीकडे करण्याबाबत उपाययोजना कराव्यात असे ते म्हणाले. येणारे दोन अडीच महिने कसोटीचे असून या काळात आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
गोंदिया जिल्ह्यात अधिकतम तापमान सन मे २०१६ या वर्षी ४७.२ व सन मे २०२२ ला ४६.२ डिग्री सेल्सिअस नोंद झाले. या वर्षी हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. निकडीचे काम असल्याशिवाय उन्हात बाहेर पडू नये, बाहेर जातेवेळी रुमाल अवश्य बांधावा, डोळ्यावर गॉगल लावावा, उन्हातून आल्याबरोबर फ्रिजमधील थंड पाणी पिऊ नये, ताक, निंबू पाणी प्यावे, पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, शक्यतो सावलीचा आसरा घ्यावा, आजारी व्यक्तींनी उन्हात जावू नये, ऊन लागल्याचे लक्षात येताच जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

         सेवा भावी संस्थाच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी सेवार्थ पाणपोई सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. आता लग्न सराईचे दिवस सुरू होणार आहेत. या काळात उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. उपाशीपोटी जास्त वेळ राहणे सुद्धा उष्माघाताचे कारण होऊ शकते असे ते म्हणाले. घराच्या छताला पांढरा रंग दिला तरी दोन ते तीन डिग्री तापमान कमी होण्यास मदत होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी व खबरदारी घेणे आवश्यक असून नागरीकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Related posts