सातारा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीने यावर राज्यभर आंदोलने केली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शरद पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शद्बांत टीका केली. मला नाही वाटत त्याला काही महत्व द्यावे. लोकसभेला, विधानसभेला ज्या व्यक्तीचे डिपॉझिट जप्त झाले त्या बद्दल काय बोलणार. त्याला लोकांनीच त्या त्या वेळेला बाजुला केले आहे. त्याची नोंद का घ्यावी, सोडून द्या, अशी शेलक्या शब्दांतील टीका शरद पवार यांनी केली.