गोंदिया: खा. मेंढे च्या रेती घाटावर औचक निरीक्षण, रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन नाही, मुदत संपल्यानंतरही अवैध उत्खनन..

382 Views

प्रशासनाच्या बेजबाबदार पणे वागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कड़क कार्रवाईचे निर्देश..

प्रतिनिधि। 23 जून
गोंदिया : प्रशासन बेजबाबदार पणे वागत असल्याचे रेती घाटाच्या संदर्भात असलेल्या व्यवहारावरून वाटते. रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना अधिकारी निर्विकार बसून राहत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेती माफियांच्या वाहनाने सामन्यांचे जीव जात असतील तर हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल असा सूचक इशारा खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला.
गोंदिया जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, सभापती संजय कटरे, महामंत्री संजय कुलकर्णी, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, ओ बी सी अध्यक्ष गजेंद्र फुंडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाल्यानंतर अवैध रेती उत्खनन संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा व बोंन्डराणी या घाटांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वेगळेच वास्तव पुढे आल्याचे खासदारांनी या बैठकीत सांगितले.
उपसा करण्यात येत असलेल्या रेतीचे सीमांकन नाही, नोंदणी पुस्तिका, सीसीटीव्ही कॅमेरे अशा कुठल्याच गोष्टीत इथे नाही. मुदत संपल्यानंतरही या घाटावरुन रेती उत्खनन होते हा आश्चर्याचा विषय असून अधिकाऱ्यांच्या संमतीने हा सगळा प्रकार होत असल्याचे म्हणत हा विषय गंभीर असल्याचे खासदार म्हणाले.
अवैध रेती आणि टिप्पर वर प्रशासन कारवाई करत नाही, मात्र घरकुलासाठी येणाऱ्या लोकांवर हमखास कारवाई करते. याच आधारे रेती वाहतूकीने दोन मजुरांचा जीव घेतला. प्रशासनाचा अवैध रेती उत्खननावर लक्ष असते तर कदाचित ही वेळ आली नसती असे म्हणत अशा वाहतुकीवर ताबडतोब अंकुश लावावा असे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी या बैठकीत दिले.

Related posts