गोंदिया: पांगोली नदी खोलीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव शासनास सादर, शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी साठा उपलब्ध होणार

488 Views

पांगोली उगम ते संगमापर्यंत ५९ बंधाऱ्याचे बांधकाम

      गोंदिया, दि.19 : पांगोली नदीपात्रातुन साचलेला गाळ काढुन नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास नदीकाठावरील गावातील पाणी टंचाई दूर होऊन पर्यायाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी साठा उपलब्ध होईल व परिसरातील गावांना पुराचा धोका कमी होईल. याकरिता प्रातिनिधीक स्वरुपाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू असून शासनाकडून लवकरच मान्यता मिळणार आहे. पांगोली नदीच्या उगम ते संगमापर्यंत एकुण ५९ बंधा-यांचे बांधकाम झालेले आहे.

         पांगोली नदीचे उगम तेढा ता. गोरेगाव येथे झालेला असुन छिपीया गावा नजीक बाघ नदीला संगम होतो. या नदीवर मृद व जलसंधारण विभागगोंदिया मार्फत तुमखेडाचुलोदटेमणीको.प.बं. खातीयाको.प.बं. कामठा व को.प.बं. पांजरा (गिरोला) असे एकुण ६ कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे या विभागातर्फे तयार करण्यात आले असुन लंबाटोलागिरोलापांजराकामठानवरगाव कला,नवरगाव(बु.),खातियाबरबसपुराटेमणीबटाणाआंभोरा व परिसरातील शेतकरी या बंधाऱ्यापासुन सिंचनाकरिता नियमित पाण्याचा वापर करीत असतात. खरीप व्यतीरिक्त रब्बी/उन्हाळी धान पिकाखालील क्षेत्र सुद्धा वाढ होण्यास मदत झालेली आहे. या प्रत्येक मोठया बंधा-यांची पाणी साठवण क्षमता ३.०० मी उंची पर्यंत आहे व पुर्ण क्षमतेने भरल्यावर प्रत्येक को.प. बंधा-यांच्या पाण्याची थोप कमीत कमी ३.०० कि.मी. पर्यंत असते. 

         पांगोली नदीवरील या विभागाव्दारे निर्मीत कोल्हापुरी पध्दतीच्या बंधा-यापासुन जवळपास ७८८ हेक्टर क्षेत्रात ओलीत होत असुन नदीपात्रात अडवलेल्या पाण्यापासुन परिसरात पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच जनावरांसाठी सुद्धा पाण्याचा वापर करण्यात येत असतो. तसेच शेतक-यांना सिंचनाकरिता पाण्याचा वापर करता येतो. याच नदीवर सन २०२०-२१ मध्ये जुन्या निरुपयोगी पुलाचे बंधा-यांत रुपांतर” हे काम करण्यात आलेले होते. प्रचलित रचना व पारंपरिक पध्दतीने बांधकाम केल्यास या कामाचा अंदाजित खर्च रु.३.०० कोटी अपेक्षीत होता.  सदर काम मृद व जलसंधारण विभागामार्फत (नविन्यपुर्ण) पध्दतीने फक्त रु.२१.०० लक्ष मध्ये पुर्ण केले होते व पुर्ण क्षमतेने भरल्यावर या पाण्याची थोप खमारी या गावापर्यत होती. आज रोजी सुद्धा छोटा गोंदिया परिसरात या बंधा-या लगत जवळपास १.०० मी खोलीचे पाणी उपलब्ध आहे. छोटा गोंदिया तसेच चुलोद भागातील उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. 

         नदी लगत छोटा गोंदिया (छत्रपती शिवाजी सरोवर /भीमघाट) परिसरास लागून असलेल्या भागाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषद गोंदिया मार्फत रु.७२.०० लक्ष मंजुर करण्यात आले असुन काम लवकरच सुरु होणार आहे. पांगोली नदी उगम स्थळापासुन ५० ते ५५ कि.मी. लांब असुन नदीचे पात्रात गाळ साचल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात नदीत वाहते प्रवाह दिसत नाही. त्याकरिता नदीचे पात्रातुन गाळ काढणे व खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यास नदीत आवश्यक तेवढा पाणी प्रवाह राहील. पांगोली नदीपात्रातुन साचलेला गाळ काढुन खोलीकरण/रुंदीकरण केल्यास नदीकाठावरील गावातील पाणी टंचाई दूर होऊन पर्यायाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी साठा उपलब्ध होईल व परिसरातील गावांना पुराचा धोका कमी होईल. याकरिता एक प्रातिनिधीक स्वरुपाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल आहे. 

        पांगोली नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास गती दिली गेल्यास इतर देखील फायदे आहेत. (१) नदीत पाणी साठा उपलब्ध असल्यास स्थानिक मच्छीमारांना सुध्दा उपयोगी येऊ शकतो. (२) नदी पात्रात पाणी साठा उपलब्ध असल्यास परिसरातील परंपरागत विटभट्टी कामगारास विट भटया व्यवसायासाठी सुध्दा पाण्याचा वापर होऊ शकतो. हे सर्व प्रयत्न यशस्वी झाल्यास पाणी साठवण क्षमतेत वाढ होईलच व त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पिकाकरिता ओलीताची सोय पर्यायाने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होईल.

पांगोली नदीद्वारे गावातील भगर्भातील पाणी पातळी वाढुन जनतेला व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊ शकते.  पुर्व विदर्भातील महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या गोंदिया जिल्हयातील गोरेगावआमगाव व गोंदिया तालुका सुजलाम सुफलाम” होऊ शकतो. पांगोली नदीच्या उगम व संगमापर्यंत एकुण ५९ बंधा-यांचे बांधकाम झालेले आहे. या नदीच्या लगत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना नदी काठावर शक्य असल्यास वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेणे बाबत कळविण्यात आलेले आहे. या प्रमाणे उगम ते संगमापर्यंत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात येत असुन येणा-या काळात पांगोली नदी एक वेगळी ओळख निर्माण करेल यात शंका नाही असे जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related posts