गोंदिया: आपत्ती सौम्यीकरणासाठी प्रशासनाची क्षमता बांधणी महत्वाची- पालकमंत्री नवाब मलिक

407 Views

 

शोध व बचाव साहित्याच्या 5 रबर बोटीचे लोकार्पण..

गोंदिया,दि.31 : जिल्ह्यात मान्सून कालावधीत पूर परिस्थिती व वेगवेगळ्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद देऊन जिवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कामगिरी मोलाची आहे. त्यामुळे आपत्ती सौम्यीकरणासाठी प्रशासनाची क्षमता बांधणीसाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

30 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शोध व बचाव साहित्यांचे लोकार्पण करतांना पालकमंत्री नवाब मलिक बोलत होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम करोटे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री मलिक पुढे म्हणाले, योग्य समन्वयातून तसेच उपलब्ध साधन साहित्याचा वापर करुन पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. आपत्ती दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सज्ज आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थितीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये शोध व बचाव पथकामार्फत शोध व बचावकार्य राबविण्यात येते. नुकतेच आमगाव तालुक्यातील जवरी-गोरठा या गावात चांदनी पाथोडे या मुलीचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत जीवाचे जोखीम पत्करून त्या मुलीचे मृतदेह रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यात अशा अप्रिय घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासनाकडून गोंदियासह राज्यातील सर्व जिल्ह्यांना जीव रक्षक रबर बोटीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. नवीन मोटर बोटीमुळे पूर परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा व बचाव करण्यास मदत होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री मलिक यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाय योजना, जिल्हा नियंत्रण कक्षाचे संचालन, मानक कार्यपद्धती (SOP) व पूर परिस्थिती दरम्यान संबंधित सर्व विभागांचे समन्वय इत्यादी बाबत इत्यंभूत माहिती घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.

राज्य शासनाकडून गोंदिया जिल्ह्यास 5 रबर बोट पुरविण्यात आले आहे. प्रत्येक रबर बोटीसह 1 मोटर इंजिन (OBM), 12 लाईफ जॅकेट, 2 लाईफबॉय, 2 चप्पू, पंचर किट उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त या सर्व शोध व बचाव साहित्यांचे लोकार्पण पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाच्या क्षमता बांधणी करून सदर सर्व साहित्य लोकसेवेसाठी समर्पित करण्यात आले. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती हाताळण्यासाठी 9 रबर मोटर बोट व 4 फायबर बोट अशी एकूण 13 बोट उपलब्ध आहेत.

लोकार्पण सोहळा कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक एस.सी.धार्मिक, दिपक परिहार, आकाश चव्हाण, राकेश डोंगरे, किशोर राठोड, सोमेश बिसेन तसेच शोध व बचाव पथकाचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts