गोंदिया: माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

579 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या आजारावर प्रतिबंध घालून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आज 3 ऑक्टोबर रोजी ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 10 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे,पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते , उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, तहसीलदार राजेश भांडारकर,अपर तहसीलदार अनिल खडतकर,गोंदिया नगर परिषदे चे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे,स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सुनील चावला व विक्की थदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया येथील गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेद्वारे जिल्ह्यात ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती’ अभियान राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण अभियानाद्वारे एकाच दिवशी जिल्ह्यातील 10 लाख लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. याकरीता अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी सेविका, महसूल विभाग, पोलीस विभाग, सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, समाजसेवी व्यक्ती आणि कर्तव्यदक्ष नागरिक तसेच इतर नागरिक जे स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी होवून जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबाच्या घरोघरी जावून कोरोना बाबतची माहिती आणि काय करावे व काय करु नये याची माहिती देणार आहेत. तसेच एका व्यक्तीद्वारे 10 व्यक्तींना जी माहिती देण्यात आलेली असून त्या 10 कुटूंबाने प्रत्येकी 10 लोकांमध्ये या मोहिमेविषयी जनजागृती करण्याचे आजच्या या मोहिमेतून आवाहन करण्यात येत आहे.

‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपल्याकडे सर्व्हेक्षण करण्याकरीता घरी येणाऱ्या चमुला जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related posts