गोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकरी आंदोलकांची प्रकृती ढासळली, प्रशासनाचे दुर्लक्ष

310 Views

 

गोंदिया(ता.17) दीड महिन्यापासून तालुक्यातील इर्री येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे हे आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलनावर बसले आहेत. आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (ता 17) सकाळी त्यांची प्रकृती ढासळली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तात्काळ मोरवाही येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तब्बल दीड महिन्यापासून सदर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून सदर आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाने डोळे फिरविल्याने परिसरातील शेतकऱ्यांत रोष दिसून येत आहे.

येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांची शेतातील झोपडी कोणतेही अतिक्रमण हटाव आदेश नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने जमीनदोस्त केली. आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध दाद मिळावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून सदर शेतकऱ्याने नऊ ऑगस्ट पासून आपल्या शेतातच कुटुंबासमवेत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. याची सूचना सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. परंतु अद्यापही जिल्हा प्रशासनातील एकाहि अधिकाऱ्याने सदर शेतकऱ्याची साधी भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. हे विशेष. अखेर आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (ता 17) सदर शेतकऱ्याची प्रकृती ढासळली. त्यांना तात्काळ जवळच्या मोरवाही आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. सदर घटनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना होताच सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला.

Related posts