कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच, अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे केंद्राचे संकेत

165 Views

 

प्रतिनिधि।

मुंबई। कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील 84 दिवसांचे अंतर कोरोनाविरुद्ध चांगले संरक्षण देते, असा दावा केंद्र सरकारने शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयात केला. कोरोना लसीकरण मोहिमेची आखणी जागतिक पातळीवरचे शास्त्रीय निष्कर्ष, जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे याचआधारे केली आहे, असे सांगत केंद्राने कोविशिल्डच्या डोसमधील 84 दिवसांचे अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

कोचीतील किटेक्स गारमेंट्स कंपनीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोविशिल्डच्या डोसमधील अंतर कमी करण्यासंबंधी केंद्राला निर्देश देण्याची विनंती कंपनीने केली आहे. त्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

कोरोना लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तज्ञ समूहाने दिलेल्या सल्ल्यांनुसार शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे लसीकरण मोहिमेत वेळोवेळी सुधारणा केली. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्याच्या तारखेनंतर 12 ते 16 आठवडय़ांनी दुसरा डोस घेण्याबाबत तज्ञांच्या शिफारसीनुसारच अंतर निश्चित केले आहे. 84 दिवसांच्या अंतरामुळे कोरोनाविरोधात लढण्यास पुरेशी प्रतिकारशक्ती प्राप्त होत आहे, असे म्हणणे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रातून मांडले आहे.

Related posts