गोंदिया: विकासापासून दूर असलेल्या बहुजन समाजाला अ, ब, क, ड प्रवर्ग आरक्षण लागू करा – माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे

201 Views

 

प्रतिनिधि।
गोंदिया: विकासापासून दूर असलेल्या भटक्या समाजाला संघटित करून मुख्य प्रवाहात आणणे तसेच दलितांची जबाबदारी व कर्तव्य समाजाला समजावून सांगण्यासाठी बहुजन रयत परिषद तर्फे राज्यात निर्धार संवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून विकासापासुन दूर असलेल्या बहुजन समाजाला लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क, ड प्रवर्ग आरक्षण लागू करून वंचित, दुर्लक्षित मागास समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रपरिषदेतून सांगितले.

स्थानिक विश्रामगृहात 5 ऑगस्ट रोजी बहुजन रयत परिषदेतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा अ‍ॅड.कोमल साळुंखे, प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 18 जुलै पासून संवाद अभियानाला सुरूवात झाली असून 5 सप्टेंबर पर्यंत संपुर्ण राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यात विखूरलेल्या दलित, मातंग, मोची, चांभार, ढोर, धनगर यासारख्या विकासापासून वंचित समाजाला एकत्रित करून त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

अ, ब,क,ड, प्रवर्ग आरक्षण लागू करण्यासाठी जिल्हा पातळीवर समाज मेळावे घेणे, शासनाकडून मिळत असलेल्या योजना, विकासात्मक बाबींचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. भटक्या समाजातील मुलांनाही शिक्षण मिळावे याकरिता राज्यातील 28 जिल्ह्यात 88 शाळा, 4 आश्रमशाळा, 26 महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षणाची सोय करण्यात आली असून जिल्ह्यातील वंचित विद्यार्थ्यांकरिता निःशुल्क शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही प्रा.ढोबळे यांनी सांगितले.

राज्यात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत अजुनही सर्वसामान्यांना माहिती नसल्याने अत्याचाराबाबत बोलण्यास आजही महिला घाबरतात. त्यामुळे या कायद्यांबाबत नवनिर्धार संवाद अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड.कोमल साळुंखे यांनी सांगितले. तर निवडणुकीत मत मागण्यासाठी येणा-या लोकप्रतिनिधींना प्रत्येकाने केलेल्या कामाचा जाब विचारावा असे आवाहन रमेश तात्या गालफाडे यांनी केले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष ढोके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts