गोंदिया: कर्ज वाटपामध्ये कुचराई करणाऱ्या बँकांमध्ये असलेली ठेव हलविणार- जिल्हाधिकारी खवले

236 Views

 

10 बँकांना कारणे दाखवा नोटीस, शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

प्रतिनिधि। 09 जुलै

गोंदिया 09: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पिक कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आज दि. 09 जुलै 2021 रोजी महसूल प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांना पत्र काढून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास कुचराई करणाऱ्या बँकांची माहिती घेऊन संबंधित विभागांचे शासकीय ठेव अन्य राष्ट्रीयीकृत बँकेत हलविण्याबाबत पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये दिनांक 25 जून 2021 रोजी बैठक घेऊन पीक कर्ज वाटप संबंधाने आढावा घेतला होता व ज्या बँका शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यामध्ये कुचराई करतील असा बँकांमध्ये शासकीय ठेवी ठेवल्या जाणार नाहीत, असे निर्देशित केले होते. याबाबत जिल्हाधिकारी खवले यांनी 05 जुलै 2021 रोजी पिक कर्ज वाटपासंबंधाने आढावा घेतला.

सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील काही बँकांची पीक कर्ज वाटपाची टक्केवारी दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत कमी होती, अश्या 10 बँकांना कारणे दाखवा नोटीस देखील बजाविण्यात आलेली आहे.

गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम करिता शेतकऱ्यांसाठी तीनशे कोटीचे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आज रोजी जिल्ह्यात जवळपास 180 कोटी म्हणजे 60 टक्के पिक कर्ज वाटप करण्यात आले आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपामध्ये कुचराई केलेली आहे, असे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या निदर्शनास आल्यामुळे सदर बँकांना पिक कर्ज मेळावा घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे लाभ देऊन बँकांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी खवले यांनी दिले आहेत.

खरीप हंगाम करिता पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास संबंधित बँकांमध्ये असलेली शासकीय ठेव अन्य राष्ट्रीयीकृत बँकेत हलविण्याची सूचना जिल्हाधिकारी खवले यांनी आज रोजी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दिली आहे.

Related posts