गोंदिया: कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल गठीत…

254 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया,दि.19 : कोविड-19 रोगाच्या संसर्गामुळे आई-वडील दोघांचेही निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले आहे.
कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक दगावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी 19 मे रोजी जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्वीनी कदम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांचे प्रतिनिधी ए.एम.गजापुरे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष संगिता घोष, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील चाईल्ड लाईन जिल्हा समन्वयक विशाल मेश्राम, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) मुकेश पटले, माहिती विश्लेषक पुनेश नाकाडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री मीना म्हणाले, कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळूवन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. कोरोनाच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची माहिती नागरिकांनी दयावी याकरीता जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयामध्ये मदतीकरीता चाईल्ड हेल्प लाईन 1098 हा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावे. बालकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात कृती दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बाल संरक्षण गृह नाही त्यामुळे जवळच्या जिल्ह्यात बालकांना बाल संरक्षण गृहात पाठविण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यात निरीक्षण गृह व बाल गृह तयार करण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts