उपचारात्मक सोयी-सुविधांमुळे कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येणार : ना. नवाब मलिक

664 Views

१२६ खाटांचे डीसीएचसी कोविड सेंटरचे लोकार्पण…
५ रूग्णवाहिका व २ अग्निशमन पथक वाहनाचे लोकार्पण…

प्रतिनिधि। 02 मई

गोंदिया। कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निश्चितपणे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढले. त्यामुळेच आरोग्य विषयक सोयी-सुविधा कमी पडू लागल्या होत्या. मात्र, मागील १५ दिवसांपूर्वी केलेल्या तयारीनुरूप आता जिल्ह्यात उपचारात्मक सोयी सुविधा वाढविण्यावर भर घालण्यात आले आहे. १२६ खाटांचे डिसीएचसी सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे रूग्णवाहिकांमध्ये भर घालण्यात आली आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाकरीता अग्निशमन पथकातही भर पडली आहे. एंकदरीत गोंदिया जिल्ह्यात उपचारात्मक सोयी-सुविधांमुळे आगामी काळात संसर्गाची परिस्थिती निश्चितपणे नियंत्रणात येणार, असा विश्वास राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.


गोंदिया जिल्ह्यात आज, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. दरम्यान त्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकूल गोंदिया येथील १२६ खाटांचे डीसीएचसीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते विश्वास व्यक्त करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले, खा.प्रफुल पटेल हे जिल्ह्याच्या कोरोना संसर्ग परिस्थितीसह इतर समस्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करून आहेत. यामुळे त्यांचे या जिल्ह्याला खुप सहकार्य मिळत आहे. यात आक्सीजन, रेमडेसिविर व औषधसाठा उपलब्ध करून देण्यास त्यांची मदत मिळत आहे.

मागील आठवड्यात आपण जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना कोरोना संसर्गाची परिस्थिती निश्चितच चिंतनिय होती. यासाठी जिल्हा प्रशासनाला जिल्हा क्रीडा संकूल व पॉलिटेकनिक येथे १२६ व १०० खाटांचे डीसीएचसी उभारण्याचे निर्देश दिले होते. यानुरूप अत्यल्प काळात जिल्हा क्रीडा संकूल येथे डीसीएचसीचे काम पूर्ण करण्यात आले. या डीसीएचसीमध्ये  114 खाट कुलरकुल्ड आहेत. तर १२ खाट वातानुकूलित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या डीसीएचसीमुळे निर्माण होणारा उपचारात्मक बाबींचा तुटवडा निश्चितपणे कमी होणार आहे. याशिवाय रूग्णवाहिकांचा तुटवडा कमी झाला आहे.

५ रूग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गोंदिया नगर परिषदेत आपत्ती व्यवस्थापनाकरीता दोन अग्निशमन पथकाचे वाहन उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकूल येथील डीसीएचसीचे कामे अत्यंत जलद गतीने करून घेण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा मोलाचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय आणखीही उपाययोजना करण्यास शासन, प्रशासन कटिबध्द आहे. असाही विश्वास पालकमंत्री मलिक यांनी व्यक्त केला आहे. या वेळी पालकमंत्री नवाब मलिक सोबत सर्वश्री पूर्व आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, आमदार सहेसराम कोरोटे, आमदार अभिजीत वंजारी, जिल्हा प्रशासनचे अधिकारी, राष्ट्रवादी कांग्रेस , कांग्रेस चे पदाधिकारी व अन्य उपस्थित होते।

Related posts