गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच मोठा निर्णय: प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

353 Views

 

प्रतिनिधि।

मुंबईः अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला आहे. आज मंत्रालयात दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
‘मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला आहे त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी महत्त्वाची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली. तसंच, कोर्टानं जो आदेश दिला आहे त्याला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल,’ असंही ते म्हणाले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांचेही आभार मानले आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली पवारांची भेट; म्हणाले…

‘मी आज पदभार स्वीकारला असून ही जबाबदारी पार पाडण्याचं काम मी करेन, असं नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप करणार नाही,’ असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. ‘पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलीस हाऊसिंगसाठी घरं बांधून घेणं या गोष्टी करायच्या आहेत,’ असं ते म्हणाले आहेत.
‘करोना संकटामुळं पोलीस रस्त्यावर उतरुन काम करत आहेत. पोलीसांचं काम कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आहे. तरीही त्यांना करोनामुळं ही ड्युटी करावी लागत आहे. एप्रिलमध्ये गुडीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानची सुरुवात सारखे विविध सण-उत्सव आहेत. प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे,’ असंही म्हणाले आहेत.

Related posts