भंडारा: टेस्टिंग, ट्रॅकिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा- पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

414 Views

 

लसीकरणात भंडारा जिल्हा अव्वल

प्रतिनिधि। 31 मार्च
भंडारा :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य व जिल्हा प्रशासनाने टेस्टिंग, ट्रॅकिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या. पालकमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्याचा कोरोना विषयाचा आढावा दूर दृष्य प्रणालीद्वारे घेतला त्यावेळी बोलत होते.

जिल्हाधिकारी संदीप कदम, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डॉ. माधुरी माथूरकर, डॉ. सचिन चव्हाण, मुख्याधिकारी विनोद जाधव व प्रशासन अधिकारी चंदन पाटील यावेळी उपस्थित होते.

जानेवारी महिन्यात कोरोना रुग्ण वृद्धी दर आटोक्यात आला असे वाटत असतांनाच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक रुग्ण संख्या वाढली. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्र्यांनी आज जिल्ह्याचा आढावा घेतला. भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 500 च्या वर गेली असून जवळपास 2600 क्रियाशील रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे मृत्यूची संख्या 341 झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यातील आहेत. कोविड टेस्टिंग वाढविण्यात आली असून दररोज 5 हजार टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली.

कोविड रुग्णालय भंडारा येथे आयसीयू बेडची संख्या वाढविण्यात आली असून ती आता 90 झाली आहे. त्याचप्रमाणे नर्सिंग होस्टेल येथील कोविड केअर सेंटरमध्ये 60, तुमसर येथे 30 व साकोली येथे 30 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह अन्य ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या 450 असून 60 रुग्ण भरती आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयात सुद्धा कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात भंडारा, पवनी व तुमसर तालुक्यात जास्त रुग्ण असून रुग्ण संख्या जास्त असलेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 24 प्रतिबंधित क्षेत्र असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच लसीकरण मोहिम यशस्वीपणे सुरू असून लसीकरणात भंडारा जिल्हा अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शन तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्यात यावा असे त्यांनी सांगितले. नगरपालिका व नगरपंचायतीनी सतर्क रहावे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील उद्योग समूहातील कर्मचारी व कामगारांची टेस्ट व लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे व जास्तीत जास्त नागरिकांना कोविड लस घेण्यासाठी केंद्रावर आणावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

नागरिकांनी मास्कचा वापर करावा, नियमित हात स्वच्छ धुवावे व सुरक्षित अंतर पाळावे असे पालकमंत्री म्हणाले. या बैठकीत आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

Related posts