तिरोड्यात आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते ५ दिवसीय भव्य क्रीडा शिबिराचे शानदार उद्घाटन

135 Views

 

​तिरोडा: अदानी फाउंडेशन व स्थानिक मल्टीपर्पस स्पोर्ट्स अँड हेल्पिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, स्व. चि. खुशाल पिंजरघरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ‘बहुउद्देशीय हिवाळी क्रीडा शिबीर २०२६’ चा शुभारंभ आज ७ जानेवारी रोजी जि.प. उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणात मोठ्या उत्साहात करण्यात आला.


​कार्यक्रमाचे उद्घाटन तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून अदानी पॉवर लिमिटेडचे स्टेशन हेड मा. श्री. मयंक दोशी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. अशोकजी असाटी, अदानी फाउंडेशन प्रमुख बिमूल पटेल, जिल्हा परिषद सदस्य मा. माधुरीताई रहांगडाले, मा. राजेश गुनेरिया, मा. अनुप बोपचे, मा. रवींद्र वाहिले, मा. विलास नागदिवे, मा. निकेश मिश्रा, मा स्वानंद पारधी आणि मा. रेश्मा शिरकुरे प्रामुख्याने उपस्थित होते.


​कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुंडीपार येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट लेझीम सादरीकरणाने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध आणि चैतन्यमयी सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, क्रीडा साहित्य पूजन आणि ‘क्रीडा ज्योत’ प्रज्वलित करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष महोदयांचा आयोजकांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
​याप्रसंगी बोलताना आमदार विजयभाऊ रहांगडाले म्हणाले की, “अशा क्रीडा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले व शहराचे नाव उज्ज्वल करावे.” श्री. मयंक दोशी यांनीही अदानी फाउंडेशनच्या वतीने खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
​हे शिबीर ११ जानेवारीपर्यंत चालणार असून यात विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप मेश्राम, सूत्रसंचालन राहुल शेजव तर आभार शहारे सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्टीपर्पस स्पोर्ट्स अँड हेल्पिंग ग्रुप, अदानी फाउंडेशनचे प्रतिनिधी,गोंदिया डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस एरोबिक असोसिएशन, उडान स्पोर्ट्स ऍकॅडमी ,
गोंदिया डिस्ट्रिक्ट जेन्सिरियो कराटे असोसिएशन,
श्री वीर शिवाजी अकॅडमी तिरोडा आणि क्रीडा प्रेमींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.

Related posts