प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने
भंडारा, दि. 26/04/2023 : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ (National- Helpline For Senior Citizens १४५६७) सर्व राज्यांत सुरु करण्यात आली आहे. या राष्ट्रीय हेल्पलाईन चा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासाई राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे आणि चांगली सेवा देणे हा आहे.
राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. सदर हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करते. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या रिस्पॉन्स सिस्टमने आपल्या राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले असून याचबरोबर निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.
या हेल्पलाइनच्या देशभरात सेवा वाढविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी (FRO) यांनी सर्व जिल्ह्यात काम सुरू केले आहे. तरी यासंदर्भात संबंधित प्रतिनिधी आपणास भेटून या संकल्पनेची अधिक माहिती देतील आणि जिल्ह्यामधून एल्डर लाइनच्या – १४५६७ च्या सेवा वाढविण्याकरिता आपले सहकार्य घेतील.