पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील नागरिकांशी साधला संवाद
प्रतिनिधि।
गोंदिया,दि.18 : सद्यस्थितीत राज्यात पुर सदृश परिस्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून कालावधीत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन ताकदीने सज्ज आहे, असे वक्तव्य जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी 16 जुलै रोजी गोंदिया व तिरोडा तालुक्यातील संभाव्य पूर प्रवण गावांची पाहणी दरम्यान केले.
जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाली असून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील आठवड्यात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. म्हणून जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पूर प्रवण गावांची भौगोलिक परिस्थिती पाहण्याकरिता गोंदिया तालुक्यातील रजेगाव, बिरसोला, कासा, काटी व तिरोडा तालुक्यातील किडंगीपार, ढिवरटोला या गावांना भेट देवून स्थानिक लोकांशी संवाद साधून या वर्षी करण्यात आलेले पूर परिस्थितीचे नियोजन व भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत संतोष खांडरे तहसिलदार गोंदिया, अनिल खडतकर अपर तहसिलदार गोंदिया शहर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कार्यकारी अभियंता राज कुरेकार, पूर नियंत्रण अधिकारी महेश भेंडारकर आणि अभिषेक यादव, इंजि. जयंत तिराले प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात वर्ष 2020 मध्ये ऑगष्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पूरपरिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानी तसेच शेतकऱ्यांचे घर, गोठे, जनावरे व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पूरप्रवण गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली व पूर येण्याची कारणे तसेच पूर परिस्थिती दरम्यान शोध व बचाव करण्याकरीता प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जाणून घेतली.
वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान तसेच वेळेवर शासनाकडून तात्काळ मदत देण्याकरीता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. सदर भागात पूल नसल्याने व रस्त्यांची उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीच्या वेळेस गावांचे संपर्क तुटतात. म्हणून या भागात असलेल्या रस्त्यांची उंची वाढविण्यासाठी व नवीन पुलांचे निर्माण करण्यासाठी गावकऱ्यांनी विनंती केली.
यावेळी गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील पूर प्रवण गावांचे सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे आवाहन, आपत्ती च्या संकटात प्रशासन व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून एकत्रित यावे
आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आपत्ती दरम्यान प्रशासना व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. सद्यस्थितीत धरण, जलाशय इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्गामुळे नदी काठावरील गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आज रोजी जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही. परंतु सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नद्या, नाले इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढली असून अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. तसेच या ठिकाणी सेल्फीचे मोह टाळावे व पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा आणि बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.