गोंदिया: बिरसी येथील सुरक्षारक्षकांच्या आंदोलनाची प्रधानमंत्री कार्यालयाकडून दखल…

705 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया–ता.(14) मागच्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या बिरसी येथील सुरक्षारक्षकांच्या आंदोलनाची दखलअखेर प्रधानमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली असून तसे पत्र प्रधानमंत्री कार्यालयाकडून संघटनेला पाठविण्यात आले आहे. तसेच या सुरक्षारक्षकांच्या मागण्या तातडीने सोडविण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

तेरा वर्ष काम करूनही स्थानिक नागरिकांना विमानतळ प्रशासनाने कामावरून पूर्णतः बंद केले आहे. आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी येथील सुरक्षा रक्षकांनी मागच्या दीड महिन्यापासून विमानतळ गेट समोर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आंदोलनाला बसलेले आहेत. सदर आंदोलनाची अद्यापही दखल जिल्हा व विमानतळ प्रशासनाने घेतली नाही. ऐव्हढेच नव्हे तर या आंदोलनाला आतापर्यंत जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अनेक संघटनांच्या वतीने भेटी देऊन समर्थन देण्यात आले परंतु अद्यापही सुरक्षा रक्षकांच्या मागण्या संदर्भात तोडगा काढण्यात आला नाही. सदर प्रश्न तातडीने मार्गी लावून त्याची सोडवणूक करावी व स्थानिक सुरक्षा राक्षकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी विनंती सुरक्षारक्षकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. तसेच जिल्हा व विमानतळ प्रशासन सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरत असल्यामुळे त्यांनी महामहिम राष्ट्रपती महोदया कडे इच्छा मृत्यूची मागणी सुद्धा केली होती हे विशेष. अखेर दीड महिन्या नंतर प्रधानमंत्री कार्यालयाने या सुरक्षारक्षकांच्या मागण्यांची दखल घेत सदर सुरक्षारक्षकांना ताबडतोब न्याय देण्यात यावा व सदर प्रश्न ताबडतोब सोडवणूक करावेत असे आदेश प्रधानमंत्री कार्यालयाने विमानतळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
देशाच्या प्रमुख कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर विमानतळ व जिल्हा प्रशासनातील अधिकारी हे किती दिवसात सुरक्षारक्षकांना न्याय मिळवून देतात की पंतप्रधान कार्यालाच्या पत्रालाही केराची टोपली दाखवितात हे येणारा काळच ठरवेल.

Related posts