समृद्धि महामार्ग अपघात: मृतांची ओळख पटविण्यात अडचण, सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय..

395 Views

 

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात 26 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. यात वर्ध्यातील 14 लोकांचा समावेश होता. या सर्वांवर रविवारी बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक आधीच बुलढाणा येते पोहोचले आहेत. अपघाताविषयी कळताच वर्धा जिल्हा प्रशासनाचे दोन पथक आणि पोलिसांचे दोन पथक देखील बुलढाण्यात दाखल झाले आहे. प्रशासनाकडून या अपघातात मृत्यू झालेल्या वर्धा येथील मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जातं आहे.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावरून जात असताना मध्यरात्री विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३० प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. यातील काही जणांना बसमधून वेळीच बाहेर पडण्यात यश आल्याने त्यांचे प्राण वाचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला असून बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

Related posts