समृद्धि महामार्ग अपघात: नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळ कोपला..

632 Views

वर्धा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

 

बहिणीला माहेरी आणायला निघाला; काळानं हिरावला, अख्खं गाव हळहळलं

 

बुलडाण्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री बस अपघातात २६ प्रवासी मृत्युमुखी पडले. कुणाचे आई-वडील, कुणाचे बहीण भाऊ, कुणाचे नातेवाईक, कुणाचा मुलगा या काळानं हिरावला. यात वर्धामधील सेलू तालुक्यातल्या झडशी गावातील करण बुधबावरे हा देखील होता.

करण घरातला एकुलता एक कमावता मुलगा. वय अवघं २८ वर्षे. मुंबईत राहणाऱ्या बहिणीला माहेरी आणायला गेलेल्या करणवर काळानं झडप घातली. त्याच्या आईवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर त्याच्या आईच्या जीवाला काय वाटलं असेल, या विचारानंच अख्खं गाव हळहळलं.

वर्ध्याच्या दोन जीवलग मैत्रिणींचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्स अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होती की त्यात 26 जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातात लहानपणापासून सोबत शिकलेल्या दोन जीवलग मैत्रिणींचा शेवटही सोबतच झालाय. नियतीच्या या खेळाने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झालंय.

समृद्धी महामार्गांवर झालेल्या या अपघातात वर्ध्याच्या दोन जीवलग मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या साईनगर येथील रहिवासी असलेल्या महेश खडसे यांची मुलगी राधिका आणि स्वागत कॉलोनी येथील रहिवासी असलेल्या मदन वंजारी यांची मुलगी श्रेया या दोघी जीवलग मैत्रिणी होत्या.

वर्ध्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघींनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पुण्यातील एक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सोमवारपासून कॉलेज सुरु होणार असल्याने राधिका आणि श्रेया वर्ध्याच्या सावंगी बायपास येथून विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याला जाण्यासाठी बसल्या होत्या. मात्र वाटेतच ट्रॅव्हलचा अपघात झाला आणि दोन्ही जीवलग मैत्रिणींचा यात मृत्यू झाला.

Related posts