‘विमाशि संघा’च्या आंदोलनापूर्वीच एक मागणी पूर्ण राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार ४ टक्‍के महागाई वाढ भत्ता

276 Views

 

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवार ७ जुलै २०२३ ला धरणे/निदर्शने आंदोलन

गोंदिया : राज्यातील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे येत्‍या शुक्रवारी ७ जुलै रोजी विदर्भस्तरीय धरणे/निदर्शने आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलनापूर्वीच राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ४ टक्‍के महागाई वाढ भत्ता देण्याची मागणी पूर्ण झाल्‍याने विमाशि संघाच्या मागणीला यश आले आहे.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. कार्यालयासमोर व शिक्षण उपसंचालक नागपूर/अमरावती यांच्या कार्यालयासमोर राज्यातील शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता देण्यासाठी शुक्रवार, ७ जुलै २०२३ रोजी विदर्भस्तरीय धरणे/निदर्शने आंदोलन पुकारले होते. यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले व प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. शालेय शिक्षण मंत्री यांना २२ जून रोजी नोटीस दिली होती. यामध्ये सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता देण्याबाबत अनुक्रमे ९ मे २०२२ व २४ मे २०२३ ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असताना राज्यातील अनेक शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तिसराच हप्ता देण्यात आला नाही. ही शिक्षकांवर अन्याय करणारी बाब असल्याने व जानेवारी २०२३ पासून केंद्रातील कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता लागू केला असल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव ४ टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविले होते.

या आंदोलनाची दखल घेत ३० जून २०२३ रोजी वित्त विभागाने सातव्‍या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ टक्‍के वरून ४२ टक्‍के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश निर्गमित केले.

या आदेशाने एक मागणी पूर्ण झाली असली तरी राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर/सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता तातडीने देण्याच्‍या मागणीसाठी शुक्रवार दि. ७ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या कालावधीत धरणे/निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. कार्यालयासमोर व शिक्षण उपसंचालक नागपूर/अमरावती यांच्या कार्यालयासमोर बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे व प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे तसेच विदर्भातील सर्व प्रांतीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यवाह यांनी केले आहे.

Related posts