मोदी सरकारचे नऊ वर्ष ठरले विकासाचे पर्व- मंत्री अरविंद भदोरिया

241 Views

 

अर्जूनी मोरगाव : मागील नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने देशहित व लोकहितासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. राष्ट्रीय सुरक्षा, आत्मनिर्भरता, वैश्विक प्रतिष्ठा, आर्थिक सुढृकीकरण आदी क्षेत्रात ऐतिहासिक उपलब्धीसह सेवा, सुशासन व गरीब कल्याणाचे मोदी सरकारचे नऊ वर्ष विकासाचे पर्व ठरले, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे सहकार मंत्री डॉ. अरविंद भदोरिया यांनी केले.


भाजपच्या महा जनसंपर्क अभियानातंर्गत अर्जुनी मोर येथील प्रसन्न सभागृहात 10 जून रोजी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. पत्रपरिषदेला गुजरातचे खा. रामभाई मोखारिया, खा. सुनील मेंढे, माजी आ. राजकुमार बडोले,प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, भंडारा गोंदिया संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सरकारने कश्मिरमधून 370 कलम हटविले, आंतकवादावर अंकूश लावला, अयोध्या येथे भव्य राम मंदिराची निर्मिती, वंचित व गरीबांसाठी विकासात्मक योजनेतून त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतले, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, रस्ते, आवास, रेशन, उज्वला योजना अशा अनेक मुलभूत सोयीसुविधा खर्‍या अर्थाने निर्माण केल्या.

डीबीटी योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के लाभ मिळत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकाळात आज देश विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास व उत्साहाने पुढे जात आहे. कोरोना सारख्या वैश्विक महामारीत देशाला सुरक्षा कवच देवून प्रगती पथावर आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात देशाने प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. रोजगार निर्मितीपासून ते आंतरराष्ट्रीय संबंधावरील कार्य देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जात आहे. त्यांचे परिश्रम व राष्ट्रनिर्माणाचा संकल्प हा निरंतर चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts