आधार कार्ड अपडेट करावे : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

1,231 Views

14 जूनपर्यंत ऑनलाईन आधार अद्ययावत केल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही

          गोंदिया, दि.8 :- जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल, केवायसी केले नसेल अशा व्यक्तींनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्वाचा पुरावा झाला आहे. त्यामुळे सर्वांनी आपले आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

         भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या दिनांक 23 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार My Aadhar ssup (https://myaadhaar.uidai.gov.inपोर्टलद्वारे ऑनलाईन आधार कागदपत्र अद्ययावत करण्याकरीता पुढील तीन महिने 15.03.2023 ते 14.06.2023 पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. https://myaadhaar.uidai.gov.in किंवा https://tathya.uidai.gov.in/login सदर प्रणालीमध्ये ऑनलाईन आधार अद्ययावत केल्यास 14 जून 2023 पर्यंत नागरिकांना कोणतेही शुल्क लागणार नाही.

         आधार अद्ययावत का करावे ? :- आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे की पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याचीही शक्यता असते. आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदणीचे अद्ययावतीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे त्यांनी आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने डेमोग्राफिक अपडेटसाठी नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, स्वत:चा फोटो, ई-मेल इत्यादीसाठी 50 रुपये आणि बायोमेट्रीक अपडेटसाठी हाताचे बोटाचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅन इत्यादीसाठी 100 रुपये शुल्क निर्धारित केलेले आहे.

         आधार अद्ययावत केल्यास मिळणाऱ्या सुविधा :- आधार अद्ययावत केल्यास अनेक शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळू शकतो. उदा. नरेगा जॉब कार्ड, पी.एम.किसान योजना, बँकेतील व्यवहार, प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता धारण, दैनंदिन गरजा इत्यादी.

        आधार अद्ययावत न केल्यास होणारे नुकसान :- आधार अद्ययावत न केल्यास कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळण्यापासून नागरिक वंचित राहू शकतो. जसे की, नरेगा जॉब कार्ड, पी.एम.किसान योजना, बँकेतील व्यवहार, प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता धारण, दैनंदिन गरजा इत्यादी योजनेपासून सामान्य नागरिक वंचित राहू शकतो.

       आधार अद्ययावत करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :- ओळखीचा पुरावा- व्होटींग कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किसान फोटो पासबुक, नरेगा जॉब कार्ड, लग्न प्रमाणपत्र सोबत फोटो, शाळेचे आयडी कार्ड, बँक पासबुक. पत्त्याचा पुरावा- बँक पासबुक, राशन कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, किसान पासबुक, नरेगा जॉब कार्ड, ईलेक्ट्रिक बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल, कर पावती, लग्न प्रमाणपत्र सोबत नाव व पत्ता, गॅस कनेक्शन बिल.

       पहिल्यांदाच आधार काढताय ? :- आपण पहिल्यांदाच आधार काढत असला तर ते पुर्णत: मोफत असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. वास्तविकत: आतापर्यंत जवळपास सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड काढलेले आहे. पहिल्यांदाच आधार काढणाऱ्या प्रौढ व्यक्ती क्वचितच सापडतील.

     आधार अपडेट कोठे कराल ? :- सीएससी सेंटर, बँक, इंडिया पोस्ट, सेतू केंद्र, अंगणवाडी/बालवाडी या ठिकाणी जाऊन नागरिक आपले आधार अपडेट करु शकतील. अनेक ठिकाणी अपडेशन करण्यासाठीची सुविधा उपलब्ध असल्याने सर्व नागरिक या संधीचा फायदा घेऊ शकतात.

       बालकांचे आधार कोठे काढाल ? :- महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 0 ते 5 वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी नि:शुल्क आहे. बालकांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये 30 संच प्राप्त झाले आहे, त्यामुळे बालकांची नोंदणी वेगाने होत आहे. आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील, या दहा वर्षाच्या कालावधीत एकदाही आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल अशा व्यक्तींनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे अपडेट करुन घ्यावीत. त्यामुळे त्यांना आधार मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील व त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.

       आधार कार्डचा गैरवापर टाळणे :- आधार कार्डचा वापर शासकीय कामकाजात/ बँकेसाठी व इतर कामासाठी केला जातो. सदर आधार कार्डचा वापर करीत असतांना त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क आधारचा वापर करावा. मास्क आधार कार्ड काढण्याची सुविधा युआयडीआय पोर्टलवर उपलब्ध आहे

Related posts