माझी वसुंधरा अभियानात विभागातून नागपूर जिल्हा व गोंदिया जिल्हा परिषद सर्वोत्तम…

215 Views

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी सन्मानित

नागपूर, दि. 5 – पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेले ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ सन्मान सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडला. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महसूल विभाग या गटात नागपूर विभागाला क्रमांक तीन चा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नागपूर विभाग स्तरावर नागपूर जिल्हाधिकारी तर जिल्हा परिषदेअंतर्गत गोंदियाला सर्वोत्तम कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूर महसूल विभागाच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
नागपूर विभागात 1 लक्ष ते 3 लक्ष लोकसंख्या गटात वर्धा नगरपरिषदेला 2 कोटी रुपये, 50 हजार 1 लक्ष लोकसंख्या गटात उमरेड नगरपरिषदेला 1 कोटी 50 लक्ष रुपये , 25 ते 30 हजार लोकसंख्या गटात देसाईगंज नगरपरिषदेला 1 कोटी 50 लक्ष रुपये, 15 ते 25 हजार लोकसंख्या गटात पवनी नगरपरिषद व खापा नगरपरिषद यांना प्रत्येकी 1 कोटी 50 लक्ष रुपये तसेच ग्रामपंचायत गटांतर्गत दावलमेटी ग्रामपंचायत, कारंजा ग्रामपंचायत, वडेगाव ग्रामपंचायत, आनंदवन ग्रामपंचायत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नागपूर विभागाची कामगिरी उंचावण्यामध्ये विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागतील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विकास शाखेचे उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, नगरप्रशासनच्या विभागीय सहआयुक्त संघमित्रा ढोके, सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी ग्रामसेवक, व सरपंच यांनी महत्वाची भूमिका पार पाडली असल्याचे संघमित्रा ढोके यांनी कळविले आहे.

Related posts