भंडारा बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरण, सात आरोपींचा गुन्हा सिद्ध; न्यायालय काय शिक्षा देणार?

998 Views

 

तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची अंतिम सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून, सातही आरोपींना उद्या शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. सातही आरोपींना मुख्य न्यायाधीश उद्या दिनांक 11/04/2023 कोणती शिक्षा सुनावतील याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ माजली होती.

2014 मध्ये घडले होते सोनी हत्याकांड

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल या तिघांचा 26 फेब्रुवारी 2014 मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असा साडेतीन कोटींचा ऐवज पळवला होता. त्यानंतर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसर येथून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी 800 पानांचे आरोपपत्र केले होते सादर

या हत्याकांडात बचावलेल्या संजय सोनी यांच्या मुलीने अ‍ॅड.निकम यांची भेट घेऊन आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या हत्याकांड प्रकरणी 800 पानांचे आरोपपत्र सोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले होते. या पुराव्याच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला असून, उद्या न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

Related posts