गोंदियाच्या मातीत गवतीचहा व सिंट्रोनिलाची लागवड, वर्षाला लाखोंचा नफा…

499 Views

कैलास बिसेन यांची प्रयोगशील शेती

 प्रतिनिधि।

गोंदिया। गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचे पीक घेतात. खरीप व रब्बी हंगामात धानाची शेती केल्या जाते. मुळातच धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. धान शेती पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्या बदलत्या चक्रानुसार धान शेती नेहमीच फायदेशीर ठरते असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. त्यासाठी कृषी विभागाची मोलाची साथ शेतकऱ्यांना मिळत असते. भाजीपाला, फलोत्पादन, मत्सशेती असे प्रयोग सातत्याने शेतकरी करीत आसतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होतांना दिसत आहे.

         प्रयोगशील शेती, गट शेती, समूह शेती असे प्रयोग जिल्ह्यात पहायला मिळतात. मात्र काही शेतकरी यापेक्षाही वेगळे प्रयोग आपल्या शेतीत करतात व त्यात यशस्वी होतात. असाच प्रयोग कैलास बिसेन यांनी आपल्या शेतात केला आहे. त्यांनी चक्क गवतीचहा व सिंट्रोनिला वनस्पतीची लागवड केली आहे. गवतीचाह तीन महिन्यांत कापण्यावर येतो असे त्यांचे म्हणणे आहे. या वनस्पती पासून तेल तयार होते. याचे शरीराला आणि आरोग्याला भरपूर फायदे आहेत. याचा वापर औषध, परफ्युम, सौंदर्य प्रसाधने आणि डिटर्जंट मध्ये प्रामुख्याने केला जातो. डास पळवण्यासाठी सिंट्रोनिलाचे लोशन, डोकेदुखीचे औषध व सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी लेमन ग्रासला मागणी आहे. कमीत कमी गुंतवणूक करून जास्त नफा यातून मिळू शकतो असे कैलास बिसेन सांगतात. कमी पाण्यात ही शेती परवडणारी आहे असेही ते म्हणाले. एक लिटर सिंट्रोनिला तेलाला ७०० ते ८०० रुपये तर गवतीचहाच्या तेलाला १२०० ते १५०० रुपये लिटर भाव मिळतो.  यातून त्यांना एकरी एक लाख ते सव्वा लाख रुपये नफा मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. भविष्यात पाच ते सात एकर क्षेत्रावर ही लागवड वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. बिसेन यांच्या पारंपरिक पिकापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा प्रयोग गावशिवारात कौतुकाचा विषय ठरला आहे.

         गोंदिया जिल्ह्यात प्रतिकुल भौगोलिक वातावरण असतांनाही एका शेतकऱ्याने चक्क गवतीचहा आणि सिंट्रोनिला वनस्पतीची लागवड केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील सोनी या गावातील कैलास बिसेन या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते धानपिक घेत असतात. धान पीक घेण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागते. मात्र दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असल्याने व खत, कीटकनाशके यांच्या वाढत्या किंमतीमुळे धानाची शेती परवडत नसल्याने त्यांनी एक एकर शेतीमध्ये गवतीचहा आणि सिंट्रोनिला वनस्पतीची लागवड केली. हा वेगळा प्रयोग त्यांनी आपल्या मेहनतीने यशस्वी करून दाखवला आहे.

         कैलास बिसेन यांनी आपल्या शेतीमध्ये १ एकर मध्ये सिट्रोनिला आणि गवती चहा वनस्पतीची लागवड केली आहे. भविष्यात जवळपास ५ ते ७ एकर क्षेत्रात ही लागवड करण्याचा त्यांचा निर्धार आहे. तर या माध्यमातून लाखो रुपये वर्षातून नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. इतर शेतकऱ्यांनीही पारंपारिक शेतीला बगल देत शेतीत नवनवीन प्रयोग करून विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related posts