ट्रकच्या धडकेत सहायक फौजदार जागीच ठार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

418 Views

 

तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

भंडारा : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या कचाट्यात सापडल्याने सहायक फौजदाराचा जागीच करुण अंत झाला. राजपूत पिसाराम मते (५६) रा.पोलिस क्वाॅर्टर, भंडारा असे मृत पावलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर त्रिमूर्ती चौकात घडली. राजपूत मते हे लाखनी पोलिस ठाण्यात रायटर म्हणून कार्यरत होते. सुटीचा दिवस असल्याने ते भंडारा येथे आले होते. बाजार करण्याकरिता ते गेले. यावेळी ते दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएफ ४०८७ ने गेले होते. रस्ता ओलांडत असताना साकोलीकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एनएल ०१ एई ७२९५ च्या कचाट्यात मते सापडले. यात ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती.मते यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना देण्यात आली. मते यांनी भंडारा, साकोली तसेच अन्य पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावले होते. सध्या ते लाखनी येथे कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Related posts