राकाँपा शिष्टमंडळाच्या वतीने धान खरेदी व विज सहित शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

619 Views

 

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन मा.श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना मा.जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केलेल्या मागण्यांमध्ये जिल्हयात शासनाच्या हमी भाव योजने अंतर्गत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळा मार्फत धान खरेदी केली जाते. जिल्ह्यातील खरीप हंगामातील धान खरेदीची उद्दिष्ट वाढवुन धानाची विक्री न केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. खरीप हंगामातील धानाची लागवड व कृषी विभागांनी निश्चित केलेली उत्पादन क्षमता याला अनुसरून जिल्हयाला सुमारे 50 लक्ष क्विंटल खरेदी उद्दिष्ट अपेक्षित होते. परंतु जिल्हयाला फक्त 39 लक्ष क्विंटल उद्दिष्ट देण्यात आले. तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली पण अनेक शेतकऱ्यांच्या 7/12 ला ती नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अत्यंत कमी दराने धान विक्री करण्याचा प्रसंग आलेला आहे.

शासनाने काही दिवसापूर्वी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केले. परंतु सदर बोनस सरासरी एकरी 375 रुपये मिळणार असे शासनानी जाहीर केलेल्या धोरणानुसार निश्चित झाले आहे. ही एक प्रकारची शेतकऱ्यांची थट्टा आहे. कारण या दोन वर्षात रासायनिक खताचे, किटकनाशकाचे, मजुरीचे व डिझेल चे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपये धानाला बोनस देण्यात यावा हि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची पूर्वी पासुनची मागणी होती. जिल्हयातील शेतकऱ्यांनी शासकिय आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे 26 डिसेंबर पासुन शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अजूनपर्यत मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे.

गोंदीया जिल्हयात धानाचे एकमेव पिक घेतले जाते त्यात खरिप व रब्बी दोन्ही पिकांचा समावेश असतो दरवर्षी खरिप पिकांच्या खरेदी साठी जे शासन निर्णय निर्गमित केले जाते. त्यात उन्हाळी भात पिकाच्या खरेदीचा उल्लेख असतो. परंतु या वर्षी निर्गमित झालेल्या शासन निर्णयात या प्रकारचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यावर्षी या जिल्हयात सुमारे 70 हजार हेक्टर वर उन्हाळी धान पिक आहे. त्यामुळे उन्हाळी धान पिकाची सुद्धा खरेदी शासनाच्या हमी भाव केंद्रावर करून शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे. यावर्षी सुरुवातीच्या काळात दिवसा 12 तास विज मिळत असल्याने शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने रब्बी पिकाचे नियोजन केले आहे. परंतु 1 फेब्रुवारी पासून यात बदल होवून 8 तास विज देणे सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे हे धोकादायक आहे कारण जंगली जनावरांचा वावर वाढल्याने अनेक दुखःद घटना घडलेल्या आहेत त्यामुळे दिवसा 12 तास विज मिळणे अति आवश्यक आहे. या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर गांभीर्याने घेऊन तात्काळ या समस्या सोडवाव्यात यासंबंधीचे निवेदन मा.श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना मा.जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत देण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळात श्री राजेन्द्र जैन, श्री गंगाधर परशुरामकर, श्री नरेश माहेश्वरी, सौ. राजलक्ष्मी तुरकर, डाॅ.अविनाश काशीवार, श्री सी.के. बिसेन, श्री केतन तुरकर, श्री सुनील पटले, श्री शैलेश वासनिक, श्री नागरतन बन्सोड, श्री आरजू मेश्राम, कपिल बावनथडे, योगी येडे, रौनक ठाकूर सहित अन्य उपस्थित होते.

Related posts